रोबोट्‌स करतील देखभाल

विज्ञानविश्‍व

मेघश्री दळवी

आज शहरीकरणाच्या युगात जगात सर्वत्र शहरांची झपाट्याने वाढ होते आहे. पाहता पाहता नवी उपनगरे निर्माण होतात. त्यामुळे रस्ते, मेट्रो, बसेसचे जाळं फोफावते. रहदारी वाढते, दुकानांमधली गर्दी वाढते, नवी रेस्टॉरंट्‌स आणि स्टॉल्स उभे राहतात. आणि मग या सगळ्याची देखभाल करणं महामुश्‍कील होऊन जाते.

पण आता या कंटाळवाण्या आणि किचकट कामाची जबाबदारी बहुतेक रोबोट्‌सकडे जाईल. इंग्लंडमधील लीड्‌स शहराने त्यासाठी एक महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. येत्या पंधरा-सोळा वर्षांमध्ये या संपूर्ण शहराची देखभाल पूर्णपणे रोबोट्‌सवर सोपवली जाणार आहे. आणि लीड्‌स हे जगातलं असं पहिलं शहर असेल!

म्हणजे लीड्‌स या गजबजलेल्या शहरात माणसासारख्या रोबोट्‌सची फौजच्या फौज फिरताना दिसतील असं नव्हे. तर इथे सहा वेगवेगळ्या प्रकारचे लहानमोठे रोबोट्‌स वापरले जातील. पहिल्या प्रकारचे रोबोट्‌स ड्रोनसारखे फिरतील आणि रस्त्यावरच्या दिव्यांची दुरुस्ती किंवा पुलांची डागडुजी अशी उंचावरची कामं करतील. दुसऱ्या प्रकारचे रोबोट्‌स वर फिरत बसतील आणि रस्त्यावर नजर ठेवतील. कुठे खड्डे दिसले किंवा फुटपाथ खराब झालेले असले तर योग्य वेळ निवडून खाली येऊन ते दुरुस्त करतील.

तिसऱ्या प्रकारचे रोबोट्‌स पूर्वनियोजित आराखड्यानुसार बांधकाम करणारे असतील. ते आयत्या वेळची कामं करणार नाहीत. चौथे असतील ते एखादं बांधकाम पाडण्याची आणि तिथल्या वस्तूंची विल्हेवाट लावण्याची कामं करणारे रोबोट्‌स.

पाचव्या प्रकारचे रोबोट्‌सना काम असेल ते पाण्याचे पाइप्स किंवा गॅसलाइन्स यांची देखरेख, मीटरवाचन, तपासणी करण्याचं आणि शेवटचे सहाव्या प्रकारचे रोबोट्‌स हे पाण्याखाली किंवा जमिनीखाली काम करू शकतील, असे असतील. कोणालाही त्रास न होता, कोणाच्याही कामात अडथळा न आणता, कमीत कमी खर्चात आणि पर्यावरणाची हानी न करता हे सहा प्रकारचे रोबोट्‌स काम करतील अशी अपेक्षा आहे.

स्वत:ची देखरेख स्वत:च करू शकेल असं स्वयंपूर्ण शहर ही कल्पना तर उत्तम आहे, आणि यासाठी लागणारं तंत्रज्ञानही उपलब्ध आहे. आता गरज आहे ते सर्व प्रक्रिया एकत्र आणून त्यांची सुसूत्रपणे मांडणी करण्याची.त्यासाठी युनिव्हर्सिटी ऑफ लीड्‌सने हा एक चॅलेंज म्हणून जाहीर केला आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांना बोलावून त्यांना सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.

अर्थात, या सगळ्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल. युनिव्हर्सिटी ऑफ लीड्‌सने त्यासाठी सुमारे दोन कोटी पाऊंडची तरतूद केली आहे. सन 2035 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल, असे गृहित धरून सर्व योजना करणे सुरू झाले आहे.

पाश्‍चात्य देशात, विशेषत: युरोपमध्ये मनुष्यबळ कमी आहे आणि कुशल कामगारांची टंचाई सतत भासत असते. अशा वेळी रोबोट्‌सकडून काम करून घेणं जास्त सोपं आणि सोयीचं वाटतं. शिवाय कदाचित ते स्वस्तही पडू शकेल. त्यामुळे हा लीड्‌सचा प्रकल्प यशस्वी झाला तर इतर पाश्‍चात्य देश त्याचं अनुकरण करतील हे नक्‍की!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)