रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

चौघांचा समावेश : तिघे उत्तरप्रदेश, तर एकजण हरियाणाचा


गणेशोत्सवातही चोरलेले 33 मोबाईल जप्त

पुणे-रेल्वेवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे. त्यापैकी तिघे उत्तरप्रदेश येथील आहेत. तर, एकजण हरियाणा येथील आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या चौकशी त्यांनी गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरलेले 33 मोबाइलसह एकूण सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आमीर आबीद शेख (35, उत्तरप्रदेश), इल्ताजा अब्दुल्ला शेख (38, जि. सहारनपूर, उत्तरप्रदेश), अलीम दिलशाद शेख (26, सहारनपूर, उत्तरप्रदेश), नजाकत अली अब्दूलअजिज शेख (32,जि. पंचकुला हरियाणा), अशी अटक केलेल्या चौघा आरोपींची नावे आहेत.
लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या घातपात पथक आणि सर्विलंस पथकाकडून जबरी चोरी, मोबाइल चोरी, सोनसाखळी हिसकावणे, असे गुन्हे करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी सुरु होती. त्यावेळी पोलीस शिपाई समीर तांबोळी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पुणे रेल्वे स्टेशनजवळील वाडीया कॉलेजजवळ असलेल्या रेल्वे ब्रीजच्या खाली अंधारात रेल्वे ट्रॅकजवळ काही जण दरोडा टाकून रेल्वे प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक दीपक साकोरे, अपर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नंदकुमार घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज खंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमर कदम, पोलीस उपनिरीक्षक अनिल पासगे आणि कर्मचारी यांची दोन पथके तयार करून सापळा लावला. त्यावेळी चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांची झडती घेतल्यावर त्यांच्याकडे पाच लाख 27 हजार 850 रुपये किंमतीचे 33 मोबाइल, एक ट्रॉली बॅग, सॅक, तसेच सत्तूर, स्टील रॉड, दोरी, मास्क, कानटोपी असे दरोड्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी हे मोबाइल गणेशोत्सवादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याचे सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)