“रेकॉल्ड’च्या आंदोलनात राजकारण्यांचा प्रवेश

कॉंग्रेससह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी दिला पाठिंबा

महाळुंगे इंगळे- खराबवाडी येथील रेकॉल्ड थर्मो प्रायव्हेट लिमिटेड तथा (अरिस्टन थर्मो ग्रुप) या वॉटर हिटर उत्पादनातील अग्रगण्य व नामांकित, बहुराष्ट्रीय कंपनीने कामगारांना कोणतीही पूर्वसूचना व कोणतीही चर्चा न करता गेल्या सहा महिन्यांपूर्वी (दि. 1 नोव्हेंबर, 2018 ) बेकायदेशीरपणे कंपनीतील यंत्र सामुग्री कालबाह्य झाल्याचे सांगत कंपनी बंद केली आहे. कंपनी बंद होवून सहा महिन्यांचा कालावधी लोटून गेला असतानाही कामगारांना अद्याप काहीच न्याय मिळाला नसल्याने आक्रमक झालेल्या कामगारांना न्याय मिळावा, यासाठी खेड तालुका शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकमुखी पाठींबा देवून या आंदोलनात उडी घेतली आहे.

रेकॉल्ड कंपनीतील कामगारांना अचानकपणे कामावरून कमी करून कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना देशोधडीला लावून त्यांच्या समोर जीवन मरणाचा प्रश्‍न निर्माण केला आहे. कंपनीच्या प्रति नेहमीच सकारात्मक भावना ठेवून या कंपनीचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे. व्यवस्थापनाच्या आडमुठे धोरणामुळे कामगार तसेच कामगारांच्या कुटुंबीयांना एका रात्रीत रस्त्यावर आणण्याचे अत्यंत निंदनीय कृत्य या कंपनीच्या व्यवस्थापनाने केलेले आहे. कामगारांनी आजपर्यंत शांततेच्या तसेच सनदशीर मार्गाने सहा महिने कंपनीच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केले. परंतु अद्यापही व्यवस्थापनाला दया आलेली नाही. व्यवस्थापन व कंपनी अधिकाऱ्यांच्या या निर्दयी व अन्यायी धोरणा विरोधात कंपनीचे सर्व कामगार आक्रमक झाले असून, सर्व कामगारांनी कामगार दिनापासून साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. कामगारांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी खेड तालुक्‍याचे शिवसेनेचे आमदार सुरेश गोरे व राष्ट्रवादीचे खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांनी जाहीर पाठींबा देवून या आंदोलनात उडी घेतली आहे.

कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावलेल्या शिवसेना व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात उडी घेवूनही गेले आठ दिवस उलटले तरी अद्याप काहीच न्याय मिळाला नसल्याने कामगारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मात्र, कामगारांना न्याय कोण मिळवून देतो, कोण या आंदोलनाचे श्रेय लाटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.