रुपी बॅंक विलिनीकरणाला गती मिळणार

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली 

पुणे – रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (आरबीआय) आपल्या धोरणात लवचिकता आणून सहकारी बॅंकांच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव मान्य करावा, तसेच टीजेएसबी बॅंकेने रुपी बॅंकेच्या विलिनीकरणाचा प्रस्ताव त्वरीत आरबीआयकडे सादर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी झालेल्या बैठकीत दिल्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रुपी बॅंकेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी बुधवारी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलविली होती. याला सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच आरबीआयचे अधिकारी, टीजेएसबी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे, बॅंकेचे अध्यक्ष मेनन, रुपी बॅंकेच्या प्रशासक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पंडित आणि सदस्य डॉ. अच्यूत हिरवे उपस्थित होते. या बैठकीत सुधीर पंडित यांनी रुपी बॅंकेच्या सध्यस्थितीची माहिती दिली. तसेच बॅंकेची आर्थिक परिस्थिती सुधारत असून बॅंकेच्या विलिनीकरणासाठी आरबीआयने मंजुरी द्यावी, असेही म्हटले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय मंडळाने केलेल्या दोन वर्षातील कामाचे कौतूक करत आरबीआयने सहकारी बॅंकांचे राष्ट्रीयकरण बॅंकामध्ये विलिनीकरणासंदर्भात असलेली सध्याची मार्गदर्शक तत्वे सहकारी बॅंकेबरोबर विलिनीकरण करताना देखील लागू करावीत, अशा सूचना केल्या. तसेच टीजेएसबी बॅंकेनेसुद्धा रुपी बॅंकेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव लवकर आरबीआयकडे सादर करावा असे सांगितले.

याबद्दल सुधीर पंडित म्हणाले, या बैठकीमुळे रुपीच्या विलिनीकरणास गती प्राप्त होण्याची अपेक्षा आहे. सहकार कायदा कलम 88 नुसार सुरू असलेली अपिल सुनावणी लवकर पूर्ण करण्यासंबंधीच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आजच्या बैठकीबाबत आम्ही सकारात्मक आहोत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीआधी आरबीआय अधिकाऱ्यांसोबत रुपीच्या प्रशासकीय मंडळाची बैठक झाली. ठेव विमा महामंडळाकडून विलिनीकरण करुन घेणाऱ्या बॅंकेला जो निधी मिळतो, तो योग्य तेवढा वाढवून मिळावा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे विलीनीकरण लवकरात लवकर होण्याबरोबरच ठेवीदारांना देखील त्याचा लाभ होऊ शकेल, असेही पंडित यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)