रुग्णालयाच्या खासगीकरणाला विरोध सुरूच

पिंपरी – महापालिकेच्या वतीने भोसरी उभारण्यात आलेल्या 100 खाटांचे सुसज्ज रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यात देण्यात येणार आहे. त्यास नागरी हक्क सुरक्षा समितीसह भारिप बहुजन महासंघाने विरोध केला आहे. हे रुग्णालय पालिकेने स्वत: चालवावे, अशी मागणी केली आहे.

या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. नागरी हक्क सुरक्षा समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका सभेत कोणतीही चर्चा न करता रुग्णालय खासगीकरणास मंजुरी दिली आहे. आजपर्यंतच्या अनुभवानुसार खासगी संस्था या नफा कमविण्यासाठी मोफत सेवा बंद करतात. शुल्क भरणाऱ्यांना प्राधान्य दिले जाते. आरोग्य सेवेमध्ये डायलेसिस, सर्जरी, पोस्ट केअर आदी सेवांवर पालिकेस लक्ष ठेवणे शक्‍य नाही. सदर रुग्णालयात पालिकेचे डॉक्‍टर व कर्मचारी जाण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे आर्थिक गैरप्रकार वाढण्याची शक्‍यता आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. पालिकेने सर्वसामान्य नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा मोफत किंवा माफक दरात पुरवावी. रुग्णालयासाठी होणाऱ्या खर्चाकडे पालिकेने लक्ष न देता नागरिकांना मूलभूत सेवा पुरवाव्यात, अशी मागणी केली आहे.

भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी दिलेल्या निवेदनात असे नमूद केले आहे की, शहरात कामगार व कष्टकऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यांना खासगी रुग्णालयातील महागडे वैद्यकीय उपचार परवडणारे नाहीत. नागरिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरविणे, हे पालिकेचे कर्तव्य आहे. पालिकेने नागरिकांच्या कररूपी पैशांतून उभारलेले रुग्णालय खासगी संस्थेला चालविण्यास देण्याची बाब निंदनीय आहे. पालिकेने वारेमाप खर्च करून रुग्णालय बांधले. मात्र, राजकीय दबावामुळे ते खासगी संस्थेला चालविण्यास दिले जात आहे. असे न करता पालिकेने स्वत: रुग्णालय चालवून सर्वसामान्य नागरिकांना मोफत वैद्यकीय उपचार द्यावेत. अन्यथा, आंदोलनाचा इशारा तायडे यांनी दिला आहे. निवेदनावर महासचिव रहीम सय्यद, राहुल इनकर, के. डी. वाघमारे, प्रदीप म्हस्के, विष्णू सरपते, राजेंद्र साळवे, भीमराव कुलकर्णी आदींच्या सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.