रुग्णांची हेळसांड (भाग-१)

रुग्णालयात रुग्णांची होणारी हेळसांड आणि यंत्रणेचा बेफिकीरपणा चर्चेत आला नाही, असा एकही दिवस जात नाही. सरकारी आरोग्य यंत्रणेतील ही बेफिकीर वृत्ती दूर करण्याचा प्रयत्न एकाही राज्य सरकारने केलेला नाही. सरकारी रुग्णालयांचा कारभार रामभरोसे सुरू असल्यामुळे खासगी रुग्णालये या परिस्थितीचा फायदा घेऊन भरपूर कमाई करतात.

रुग्णालयात एखाद्या रुग्णावर उपचार सुरू असताना डॉक्‍टरांनी किंवा व्यवस्थापनाने बेफिकिरी दाखविल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्यास हल्ली धक्का बसत नाही, तर प्रश्‍न उपस्थित होतो. मृत्यूशी झुंज देण्यासाठी रुग्णालयात दाखल झालेल्यांना मरणाची खिरापत वाटण्याची ही प्रवृत्ती थांबणार तरी कधी, असा तो प्रश्‍न असतो. एखादे सरकारी किंवा खासगी रुग्णालय रुग्णांसाठी वरदान ठरले असून, तेथील यंत्रणा अत्यंत सक्षम असल्यामुळे रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाइकांचा संबंधित रुग्णालयावर भरोसा आहे, असे ठिकाण उदाहरणासाठीही शिल्लक राहिलेले नाही. हीच परिस्थिती सर्व राज्यांत पाहायला मिळते. मदुराई येथील एका रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असताना अचानक वीजच गायब झाली आणि पाच रुग्णांना प्राण गमवावे लागले. इकडे महाराष्ट्रातसुद्धा ठाण्याच्या 15 रुग्णालयांमध्ये अग्निरोधक प्रणालीविषयीच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले आहे. रुग्णालयांमधील बेजबाबदारपणाची ही ताजी उदाहरणे होत. उत्तर प्रदेशातील एका रुग्णालयात तर बेजबाबदारपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या गेल्या आहेत. अलीगढमधील एएमयू मेडिकल कॉलेजमध्ये विषप्राशन करणाऱ्या एका महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना या महिलेच्या तोंडात मोठा स्फोट झाला आणि तिचा मृत्यू झाला. या महिलेने विष नव्हे तर ऍसिड प्राशन केले असावे, असा प्राथमिक अंदाज होता.

रुग्णांची हेळसांड (भाग-२)

दरम्यान, न्यायवैद्यक प्रयोगशाळेने असे म्हटले आहे की, महिलेच्या पोटात तयार झालेल्या अल्फोस गॅसचा हवेशी संपर्क आल्यामुळे हा स्फोट झाला. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणावरही जबाबदारी निश्‍चित करण्यात आलेली नाही. सार्वजनिक रुग्णालयांमधील दुरवस्थेची ही समस्या जगजाहीर आहे. अशा रुग्णालयांमध्ये झालेल्या बेजबाबदारपणामुळे रुग्णाला जीव गमवावा लागल्याची असंख्य उदाहरणे वारंवार समोर येत असतात. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षम असलेल्या कुटुंबाचा कल रुग्णावर खासगी रुग्णालयातून उपचार करवून घेण्याकडेच असल्याचे पाहायला मिळते. सरकारी रुग्णालयांकडे फिरकण्यास बहुतांश लोक तयार नसतात. या रुग्णालयांमधील बेजबाबदारपणामुळे जो असंतोष निर्माण होतो, त्याचा लाभ खासगी रुग्णालये करून घेतात. खासगी रुग्णालयांमध्ये वेगळ्या प्रकारची मनमानी चालते. उपचारांच्या नावाखाली अतार्किक स्वरूपात पैसे वसूल केले जातात. मात्र, पायाभूत सुविधांच्या बाबतीत सर्वसाधारण नियम आणि कायद्यांची फिकीर खासगी रुग्णालयेही बाळगत नाहीत. मदुराईच्या एका सरकारी रुग्णालयात अतिदक्षता विभागात काही रुग्ण मृत्यूशी झुंज देत असतानाच वीजपुरवठा खंडित झाला. या कक्षातील पाच रुग्णांचा या काळात मृत्यू झाला. अर्थात, या पाचही रुग्णांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा रुग्णालयाच्या प्रशासनाने केला आहे. नेमक्‍या त्याच वेळी वीजपुरवठा खंडित होणे, हा योगायोग असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे; परंतु मृतांचे नातेवाईक रुग्णालयाचा हा दावा मान्य करण्यास तयार नाहीत.

– सूर्यकांत पाठक, अ.भा. ग्राहक पंचायत

Leave A Reply

Your email address will not be published.