रुग्णवाहिका बंद; खासगी वाहनांचा सुकाळ

आंबेगाव तालुक्‍याच्या आदिवासी भागात आरोग्यसेवेचा बोजवारा
मंचर (प्रतिनिधी) –
आदिवासी भागातील राजपूर (ता. आंबेगाव) येथील रखमाबाई बबन लोहकरे (वय 35) या महिलेला शनिवारी (दि. 11) सकाळी सर्पदंश झाला. यानंतर महिला उपचारासाठी तळेघर येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात आली. येथील डॉक्‍टरांनी प्राथमिक उपचार करून महिलेला पुढे पाठविण्यास सांगितले; पंरतु रुग्णवाहिका बंद असल्याने या महिलेची गैरसोय झाली. शेवटी खासगी वाहनाला जादा भाडे देऊन त्यांना पुढील उपचारासाठी न्यावे लागले.

आदिवासी भागातील आरोग्यसेवेचा बोजवारा उडाला आहे. सध्या पावसाळी दिवस असल्याने सर्पदंशसारखे प्रकार घडत आहेत. याबरोबरच गरोदर मातांचीही प्रसुतीसाठी गैरसोय होत आहे. आदिवासी भागांत आरोग्यसेवेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करूनही काही उपयोग झालेला नाही. सध्या करोनासारखी महामारीची आपत्ती देशभर पसरली आहे. अशा स्थितीत रुग्णवाहिका अद्ययावत असणे गरजेचे आहे. मात्र, ग्रामीण भागात रुग्णवाहिकेअभावी रुग्णांची अशी हेळसांड होत असल्याने परिसरातून संताप व्यक्‍त होत आहे. याची दखल घेऊन आदिवासी भागात आरोग्यसेवा सुरळीत होण्याची मागणी स्थानिकांमधून होत आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी विचारले असते याबाबत “मी चौकशी करतो’, असे त्यांनी सांगितले आहे.

ठेकेदारांच्या मनमानीचा रुग्णांना फटका
मागील महिन्यात राज्याचे कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील व शिरुर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दौरा केला. त्यावेळी 108 ची रुग्णवाहिकेची तक्रार देण्यात आली होती. यावेळी एक गाडी तयार ठेवण्याचे आदेश त्यांच्याकडून देण्यात आले होते; परंतु तसे न होता या आदेशाला प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली आहे. यातच जिल्ह्यात 108 व 102 रुग्णवाहिका ठेकेदाराच्या मनमानीचा फटका आदिवासी भागातील आरोग्यसेवेला बसत आहे.

102 चे चालक संपावर आहेत, तर 108 ची रुग्णवाहिका वरिष्ठांच्या आदेशाने बाहेर आहे. वास्तविक एक गाडी सतत येथे असणे आवश्‍यक आहे.
– डॉ. जयेश बिरारी, तळेघर, ता. आंबेगाव

प्रत्येक आरोग्य केद्राच्या 102 रुग्णवाहिकेस देखभाल-दुरुस्ती व डिझेलसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. स्थानिक अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य यांच्या तक्रारीनुसार उपाययोजना केल्या जात आहेत. तळेघरबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

“108′ सहा महिन्यांपासून बंद, तर “102′ संपावर
आंबेगाव तालुक्‍यातील पश्‍चिम आदिवासी तळेघर आयुष्यमान भारत (प्राथमिक आरोग्य) केंद्रात 23 गावे आहेत. सुमारे 15 हजार लोकसंख्या असलेला परिसर आहे. येथील गावांना आरोग्यसेवा उपलब्ध होण्यासाठी तळेघर येथे मध्यवर्ती केंद्र आहे. येथे सर्पदंश लस उपलब्ध आहे; पंरतु व्हेंटिलेटर नसल्याने प्राथमिक उपचार करून पुढे घोडेगाव व मंचर ग्रामीण रुगणालयात पाठविले जाते. याबरोबरच गरोदर मातांनाही प्रसूतीसाठी घोडेगाव व मंचर येथे पाठविले जात आहे. मात्र, येथील 108 ची रुग्णवाहिका 6 महिन्यांपासून गायब, तर 102 ची रुग्णवाहिका चालकांचा संप आहे. त्यांना ठेकेदार एजन्सीकडून 5 महिने मानधन नाही. तीही गाडी बंद आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.