रीव्ह्यू घेण्यात चूक झाली – लोकेश राहुल 

दुबई: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अफगाणिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात भारतीय संघाला पंचांच्या काही चुकीच्या निर्णयांना सामोरे जावे लागले. या सामन्यात धोनी आणि दिनेश कार्तिक पायचीत असल्याचा पंचांनी दिलेला निर्णय चुकीचा असल्याचे “रीप्ले’मध्ये निष्पन्न झाले होते. मात्र रीव्ह्यूच शिल्लक नसल्याने भारतीय संघाला पंचांच्या खराब निर्णयांची शिकार व्हावे लागले.
त्याआधी सलामीवीर लोकेश राहुललाही पंचांनी रशीद खानच्या गोलंदाजीवर पायचित दिले होते. परंतु समोर असलेल्या दिनेश कार्तिकशी चर्चा न करताच राहुलने रीव्ह्यू घेतला. परंतु तिसऱ्या पंचांनी त्याचे अपील फेटाळून मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. परिणामी भारताचा एकमेव रीव्ह्यू वाया गेला. आपण रीव्ह्यू घेतला नसता तर बरे झाले असते, असे सांगून लोकेश राहुलने आपली चूक कबूल केली.
अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणारा हा सामना बरोबरीत सुटला. या सामन्यातील चमकदार कामगिरीबद्दल अफगाणिस्तानच्या संघाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत असतानाच पंचांच्या चुकीच्या निर्णयांवर टीकाही केली जात आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यातील भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि दिनेश कार्तिक चुकीच्या निर्णयावर बाद झाले. या वेळी पंचांचा निर्णय चुकीचा असल्याचे दिसत असतानाही रीव्ह्यू शिल्लक नसल्या कारणाने त्यांना तिसऱ्या पंचांकडे दाद मागता आली नाही आणि भारतीय संघाचे मोठे नुकसान झाले.
सामन्यानंतर बोलताना भारतीय संघाचा सलामीवीर लोकेश राहुल म्हणाला की, मागे वळून पाहिले असता असे वाटते की, मी रीव्ह्यू घेण्याचा निर्णय घेऊन मोठी चूक केली. त्या क्षणी मी समोरच्या फलंदाजाचा सल्ला घ्यायला हवा होता. मी ही चूक केली नसती तर त्याचा फायदा महेंद्रसिंग धोनी अथवा दिनेश कार्तिक यांना झाला असता. आता सामना संपल्यानंतर मी त्या घटनेकडे पाहिल्यावर निश्‍चितपणे जाणवते की, मी तो रीव्ह्यू घ्यायला नको होता. चेंडू यष्टीच्या बाहेर जाईल असा माझा अंदाज होता, त्यामुळे मला एक संधी घ्यायची होती. मात्र दुर्दैवाने तो निर्णयही माझ्याविरोधात गेला. हा रिव्ह्यू माझ्या इतर सहकाऱ्यांच्या कामी आला असता असेही मला वाटत आहे. पण त्यावेळी मी लावलेला अंदाज पूर्णपणे चुकल्यामुळे यावर आता फारसे बोलणे योग्य ठरणार नाही.
अफगाणिस्तानच्या खेळाडूंचेही राहुलने कौतुक केले. यापुढे अफगाणिस्तानला कमी लेखण्याची चूक कोणालाच करता येणार नाही. वन-डे आणि टी-20 क्रिकेटमध्ये ते आता एका तुल्यबळ संघाप्रमाणे खेळत आहेत. अशा रंगतदार सामन्यांमध्ये तुम्ही एक खेळाडू म्हणून खेळलात याचेही तुम्हाला समाधान मिळते. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ आता एक गुणवान संघ म्हणून पुढे येत आहे असेही राहुलने यावेळी सांगितले.
दुसरीकडे भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू आणि या सामन्यातील कर्णधार महेंद्रसिंग धोनीने देखील पंचांच्या निर्णयावर अप्रत्यक्षपणे टीका करताना सांगितले की, आपल्याला काही गोष्टींवर लक्षपूर्वक काम करण्याची गरज आहे. तसेच काही गोष्टी अशा आहेत की त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. कारण मला दंड भरण्याची किंवा शिक्षा करून घेण्याची इच्छा नाही. मात्र सर्वांनी आपले काम चोख केले, तर कोणालाच तक्रारीला जागा राहणार नाही.
संघात स्थान नसणे त्रासदायक 
माझ्या एकदिवसीय कारकिर्दीला आता दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे, आणि या काळात मला केवळ 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळाले आहे, असे सांगून लोकेश राहुल म्हणाला की, दोन वर्षांत मला राष्ट्रीय संघात आपले स्थान निश्‍चित करता आले नाही याचा मला त्रास होतो आहे. मात्र या बाबत मी तक्रार करू शकत नाही. कारण सध्या भारतीय संघात एकापेक्षा एक प्रतिभावान खेळाडू असून ते चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे भारतीय संघाकडून खेळण्यासाठी संधीची वाट पहाणे गरजेचे असून मिळालेल्या संधीचे सोने करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकेश राहुलने एकदिवसीय पदार्पणानंतर गेल्या दोन वर्षात केवळ 13 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याने चार वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी केली आहे. राहुल सर्वाधिक 7 वेळा सलामीला उतरला असून त्यात दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. संघातील आपल्या स्थानाबाबत बोलताना राहुल म्हणाला की, मी सलामीच्या स्थानावर फलंदाजी करताना चांगला खेळ करू शकतो. त्यामुळे मी आघाडीच्या फळीतीलच फलंदाज आहे असे म्हणता येऊ शकेल. मात्र, संघाच्या गरजेनुसार तुम्हाला वेगवेगळ्या स्थानांवर फलंदाजी करणे आवश्‍यक असते आणि मी त्यासाठी सदैव सज्ज असतो.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)