रिमांड होममधील मुलांनाही सर्व सुविधा मिळणे आवश्‍यक

आ. शिवेंद्रसिंहराजे; अंतर्गत रस्ता, संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ
सातारा, दि. 25 (प्रतिनिधी) – बाल सुधारगृह म्हणजेच रिमांड होममध्ये अनाथ मुलांसह बाल गुन्हेगारांना ठेवले जाते. याठिकाणी त्यांना शिक्षणासह इतर बाबींमधून चांगले नागरिक घडवण्याचे प्रयत्न केले जातात. रिमांड होममधील मुले भविष्यात देशाचे चांगले व जबाबदार नागरिक घडले पाहिजेत. यासाठी त्यांना रिमांडहोममध्ये चांगल्या दर्जेदार सुविधा मिळणे आवश्‍यक आहे, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
रिमांड होम येथे आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या विशेष प्रयत्नातून अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणे आणि रिमांड होम परिसराला संरक्षक भिंत बांधणे या कामाला मंजुरी मिळाली. या दोन्ही कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यानंतर आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते या दोन्ही कामांचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी रिमांड होमचे सचिव प्रदीप साबळे- पाटील, सदस्य ऍड. शामप्रसाद बेगमपुरे, बांधकाम विभागाचे सहायक अभियंता राहूल अहिरे, शाखा अभियंता रवींद्र आंबेकर, डॉ. अभिजित भोसले, अजित देशमुख, अभिजित पाटील, मिलींद कदम आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
रिमांड होम येथे एडसग्रस्त मुलांसाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चाने स्वतंत्र इमारत बांधून दिली आणि त्यांच्या प्रयत्नातून आज संरक्षक भिंत आणि अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण ही कामे होत आहेत. याबद्दल रिमांड होम प्रशासनाने आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले.
यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, अनाथ मुलांच्या संगोपणाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळणाऱ्या रिमांड होममध्ये सोयी सुविधा पुरवण्यासाठी, अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न केले आहेत. रिमांड होमधून संस्कारक्षम आणि सक्षम देशाची पुढची पिढी घडवण्याचे काम केले जात आहे. यापुढेही आपण रिमांड होमच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबध्द राहू, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.