रिक्षाचालकाच्या सतर्कतेने मुलाचे अपहरण फसले

पारप्रांतीय अपहरणकर्ता पळाला ः सीसीटीव्हीत घटना कैद

लोणी काळभोर-रिक्षाचालकाची समयसूचकता व त्याने दाखवलेली सतर्कता यामुळे एका अल्पवयीन मुलाचे होणारे अपहरण टळले; परंतु परप्रांतीय अपहरणकर्ता मोका साधून पळून जाण्यास यशस्वी झाला आहे. तो सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीनाथ राहुल मोडक (वय 6, रा. वडकी, ता. हवेली) हा मुलगा रिक्षाचालक सलीम शेख याने प्रसंगावधान दाखवल्याने सुखरूप घरी पोहोचला आहे. 21 फेब्रुवारी रोजी शाळेतून आल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो आपल्या घरासमोरच्या अंगणात एकटाच खेळत होता. काही वेळाने त्याठिकाणी एक परप्रांतीय अनोळखी इसम आला. त्याने श्रीनाथ यास बिस्कीटाचे अमिष दाखवून खाण्यास दिले. नंतर तुला वडिलांनी बोलावले आहे, असे सांगून तो मुलास घेऊन गेला.ते दोघे वडकी येथून हांडेवाडी चौकापर्यंत पायी चालत आले. तेथे एका रिक्षामध्ये बसून ते दोघे पुणे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाले. रिक्षात बसल्यानंतर श्रीनाथ याने त्याच्याकडे वडिलांसंदर्भात मराठीतून विचारणा केली असता तो हिंदी भाषेत बोलत आहे. हे ऐकून रिक्षाचालक सलीम शेख यांना संशय आला. म्हणून शेख यांनी श्रीनाथबाबत चौकशी केली असता त्या इसमाने हा आपल्या भावाचा मुलगा असून लहानपणापासूनच पुण्याला वास्तव्यास असल्याने तो मराठीतून बोलत आहे, असे सांगितले. हे ऐकून शेख यांचा संशय आणखी बळावला. म्हणून त्यांनी मुलाच्या वडिलांसोबत फोनवरुन बोलणे करून देण्यास सांगितले. यामुळे तो इसम घाबरला. हे लक्षात येताच शेख यांनी आपली रिक्षा हडपसर भाजी मंडई येथे रस्त्याच्या कडेला उभी केली. त्यावेळी हा इसम फोन करण्याचा बहाण्याने खाली उतरला व पळून गेला. शेख यांनी त्याचा पाठलाग केला; परंतु रिक्षामध्ये श्रीकांत एकटाच आहे, हे लक्षात येताच त्यांनी पाठलाग थांबवला व रिक्षापाशी आले. शेख यांनी श्रीनाथ यास त्याचे नाव पत्ता आदी माहिती विचारली असता तो वडकी येथील रहिवासी असल्याचे निदर्शनास आले. ते त्याला घेऊन ऊरूळी देवाची दूरक्षेत्र येथे गेले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक राजू महानोर यांना सर्व हकीकत सांगितली त्यानंतर महानोर यांनी आपल्या पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने श्रीनाथ याचे घर शोधले व त्याला त्याचे आईवडीलांच्या ताब्यात दिले. तेही मुलाचा शोध घेत होते. आपला मुलगा अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुखरूप परत आला हे पाहून त्यांना आनंद झाला. त्यांनी रिक्षा चालक शेख व पोलीसांचे आभार मानले.

  • नवीन रिक्षा घेऊन देणार
    लोणी काळभोर पोलीस ठाण्यात हवेलीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सई भोरे यांनी समयसूचकता दाखवून श्रीनाथ यांची अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केल्याबद्दल सलीम शेख यांचा सत्कार केला. समाजात आपापले कर्तव्य पार पाडत असतानाच आसपास घडणाऱ्या संशयास्पद घटनांबाबत शेख यांच्या प्रमाणेच सतर्क राहणे गरजेचे असल्याचे सांगितले. तसेच श्रीनाथ याचे आईवडील राहूल व माधुरी यांनी शेख यांचेमुळे आमचा मुलगा सुखरूप परत मिळाला असल्याचे सांगितले. या कार्याचे पारितोषिक म्हणून त्यांना नवीन रिक्षा घेऊन देणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान, राजू महानोर, श्रीकांत इंगवले उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.