“रिंग’ निविदांवर स्थायीची वक्रदृष्टी

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेने काढलेल्या रस्ते विकास कामाच्या पाच निविदांमध्ये रिंग झाल्याची बाब प्रथमदर्शनी स्थायी समितीच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे या निविदा रद्द करुन फेरनिविदा प्रसिद्ध करण्याची मागणी स्थायी समितीने आयुक्‍तांकडे केली आहे. तसेच या प्रकरणी फौजदारी करण्याचीही शिफारस स्थायीच्या वतीने करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती साप्ताहिक सभा मंगळवारी (दि.12) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती ममता गायकवाड होत्या. विषय पत्रिकेवरील 33 विषय मंजूर करण्यात आले. तर, 22 विषय तहकूब करण्यात आले. एक विषय फेटाळला असून एक प्रशासनाने मागे घेतला आहे.

स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी या सभेची पत्रकारांना माहिती दिली. रस्ते विकासाच्या दहा निविदांमध्ये “रिंग’ होणार असून दोनच ठेकेदांराना कामे मिळणार असल्याची तक्रार सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी आयुक्‍तांकडे केली होती. त्यानुसार पाच कामे आजवानी इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि यांना चार कामे आणि एक काम कृष्णाई इन्फ्रा स्ट्रक्‍चर प्रा. लि यांना मिळाल्याची माहिती स्थायी समितीला उपलब्ध झाली आहे. यामध्ये रिंग झाल्याचे सकृतदर्शनी स्थायी समिती सदस्यांना आढळले आहे.

सत्ताधारी भाजपकडून या दोन ठेकेदारांना वरील कामे मिळाली असल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. फौजदारी गुन्हा दाखल करावा. त्याकरिता समिती नेमून चौकशी करण्यात यावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना कोणतेही काम देण्यात येऊ नये. रिंग झालेल्या पाच निविदा रद्द करुन फेरनिविदा करण्यात यावी, अशी शिफारस स्थायी समितीने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली असल्याचे, मडिगेरी यांनी सांगितले.

महापालिकेतील स्थापत्यविषयक कामांमध्ये रिंग होत असल्याचा आरोप सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षांतील नगरसेवकांनी केला होता. याची दखल सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. निविदा कार्यवाही करून त्यात दोषी आढळल्यास कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत. भाजपचे नगरसेवक तुषार कामठे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक मयूर कलाटे यांनी रिंग बाबत प्रशासनावर आरोप केले होते. सत्ताधारी नगरसेवकांनी हल्लाबोल केल्याने सत्ताधारी अडचणीत आले होते.
संतपीठांच्या विषयावरील चर्चेत विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी रिंगमधील ठेकेदारांची नावे वाचून दाखविली होती. यावरूनच सत्ताधारी आणि विरोधकांत जुंपली होती. सर्वसाधारण सभेत यावरुन गोंधळही झाला होता. आज झालेल्या स्थायी समिती सभेत यावर चर्चा झाली. याबाबत सदस्य विलास मडिगेरी म्हणाले, रिंगचे आरोप झाल्याने पुनर्निविदा काढाव्यात, अशी सूचना शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी केली होती. निविदा प्रक्रिया रद्द केल्यावर त्यासाठी कालावधी अधिक लागेल आणि कामे खोळंबतील. त्यामुळे निविदा प्रक्रिया पूर्ण करून ज्या निविदांबाबत आक्षेप नोंदविले आहेत. त्यात तथ्य आढळल्यास ठेकेदारांवर कारवाई करण्याची शिफारस स्थायी समितीने केली आहे.

या विकासकामांमध्ये रिंगचा संशय
प्रभाग क्रमांक 16 रावेत येथील डीपी रस्ता विकसित करणे (23 कोटी 3 लाख), मुकाई चौक ते समीर लॉन्सपर्यंतचा रस्ता विकसित करणे (22 कोटी 69 लाख) गहुंजे बॉर्डर ते लेखाफार्म 12 मीटर सर्व्हिस रस्ता विकसित करणे (21 कोटी 75 लाख), प्रभाग क्रमांक 25 वाकडगावठाण रस्ता विकसित करणे (14 कोटी 39 लाख) ही चार कामे आजवानी इन्फ्रास्ट्रक्‍चर प्रा. लि यांना आणि प्रभाग क्रमांक 25 भुजबळ वस्ती ते भुमकर वस्ती 30 मीटर डीपी रस्ता विकसित करणे (23.69 लाख) हे काम कृष्णाई इन्फ्रा स्ट्रक्‍चर प्रा. लि यांना मिळाले असल्याची माहिती समितीला उपलब्ध झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.