रास्ता रोको नाही तर कांदे वाटून आंदोलन

आंदोलकांचा पावित्रा ः पोलीस निरीक्षक शेलार यांनी नाकारली आंदोलनाची परवानगी

केंदूर-खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण रोड, चौफुला पिंपळे जगताप (ता. शिरूर) या ठिकाणी आज केंदूरच्या माजी उपसरपंच रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली 10 वाजता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन होणार होते; मात्र त्याला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारल्याने आंदोलकांनी दिशा बदलून येणाऱ्या प्रवाशांना कांदे वाटून आंदोलन करणार असल्याची माहिती दिली.
यावर्षी दुष्काळाच्या छायेखाली शेतकरी अडकला असतानादेखील कसा बसा शेतमाल पिकवला; मात्र त्यालादेखील भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. तरीदेखील या भाजप सरकारला जाग येत नाही म्हणून सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सरकारचा निषेध म्हणून केंदूर, करंदी, पिंपळे जगताप, जातेगाव, वढू बुद्रुक यांसह 10-12 गावांतील शिवसैनिक आणि शेतकरी एकत्र येत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंदूरच्या माजी उपसरपंच रवी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे. मात्र या रास्ता रोको आंदोलनाला शिक्रापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सदाशिव शेलार यांनी रास्ता रोकोला परवानगी नाकारली. सोबत प्रवाशांना किंवा समाजातील इतर घटकांना त्रास होणार नाही, असे आंदोलन करण्याचा सल्लादेखील आंदोलकांना दिला. त्यामुळे आंदोलकांनी मागण्या त्याच; परंतु आंदोलनाची दिशा बदलून रास्ता रोको ऐवजी प्रवाशांना फुकट कांदे वाटप करून आंदोलन करणार असल्याचे सांगितले.

 • आंदोलकांच्या मागण्या
  1) कांद्याला 10 रुपये प्रति किलो अनुदान जाहीर करा
  2) उसाला एफआरपीप्रमाणे पहिल्या हप्त्याची पूर्ण रक्कम एकरकमी जमा करा
  3) शेतीला हमीभाव द्या, अन्यथा गांजा उत्पादनाला परवानगी द्या
 • रास्ता रोको करून प्रवाशांना आणि इतर लोकांना त्रास होईल, असे आंदोलन करणे योग्य नाही. आंदोलकांच्या मागण्या वरिष्ठांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करू.
  -सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक, शिक्रापूर
 • जरी रास्ता रोकोला परवानगी नाकारली असली, तरी आम्ही ठिय्या आंदोलन करून फुकट कांदे वाटप आंदोलन करणार आहोत.
  -समाधान डोके, संघटक शिवसेना शिरूर-आंबेगाव
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)