राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाकडे?

जयंत पाटील, शशिकांत शिंदे व वळसे-पाटील यांची नावे आघाडीवर


सुनील तटकरे यांनी सूत्रे खाली ठेवली

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पाश्वभूमिवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांचा चेहरा बदलला जाणार आहे. विद्यमान प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे सुनील तटकरे यांनी आपल्या पदाची सुत्रे खाली ठेवली असून माझ्याऐवजी दुसऱ्यांकडे ही जबाबदारी देण्याची विनंती पक्षश्रेष्ठींना केली आहे. त्यामुळे 29 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणूकीत प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे पक्षश्रेष्ठी कोणाकडे देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या पदासाठी माजी मंत्री जयंत पाटील, शशिकांत शिंदे आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांची नावे आघाडीवर आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शरद पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची फेरनिवड झाली आहे. प्रदेशाध्यक्षांसह इतर कार्यकारिणीची निवड 29 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासंदर्भात आज झालेल्या पत्रकार परिषदेत सुनील तटकरे यांनी आपण प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे आपण खाली ठेवत पुढील प्रदेशाध्यक्षपदी आपण असणार नसल्याचे सांगितले.

मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आपण चार वर्षांपूर्वी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. राज्यात वेगळ्या प्रकारचे वातावरण असताना आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो आणि कॉंग्रेसच्या बरोबरीने जागा राखण्यात यशस्वी झालो. आता अन्य कुणालाकडे तरी ती जबादारी द्यावी, अशी विनंती मी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. पक्षात अनेक सक्षम नेते आहेत. 29 एप्रिल रोजी सर्वजण एकत्र बसून नव्या अध्यक्षांची घोषणा करू, असे सुनील तटकरे म्हणाले.

पुणे येथे 29 एप्रिल रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी माजी मंत्री जयंत पाटील आणि शशिकांत शिंदे तसेच माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात आरोप झालेले आहेत.

नवा अध्यक्ष देताना स्वच्छ प्रतिमेचा चेहरा देण्याचा विचार सुरू आहे. या निकषानुसार 15 वर्षे मंत्रिमंडळात राहूनही जयंत पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही. विधानसभेचे गटनेते म्हणून गेली तीन वर्षे त्यांनी चांगले काम केले आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना तरुण मराठा चेहरा देण्याचाही एक विचार सुरू आहे. त्यानुसार शशिकांत शिंदे यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. शिंदे हे कामगार नेते आहेत. तर अभ्यासू नेता म्हणून दिलीप वळसे-पाटील यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे. मात्र. सध्या तरी जयंत पाटील यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.

तटकरेंची राष्ट्रीय महासचिवपदी वर्णी
सुनील तटकरे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांतील त्यांची कामगिरी पाहून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची नेमणूक पक्षाच्या राष्ट्रीय महासचिवपदी नेमणूक केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार तारिक अन्वर यांनी आज त्यांची नेमणूक जाहिर केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)