राष्ट्रवादीने “वंचित’मुळे आठ जागा गमावल्या

खासदार सुळेंची कबुली : मयुरेश्‍वराच्या चरणी लीन

मुर्टी- वंचित बहुजन आघाडीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने आठ जागा गमावल्या आहेत. तसेच झालेल्या पराभवाचे राष्ट्रवादीने आत्मचिंतन सुरू केले आहे. तसेच आगामी विधानसभेत या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये व ते टाळण्यासाठी हे आत्मचिंतन केले जात आहे, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

बारामती लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विजयानंतर बुधवारी (दि. 29) मोरगावातील मयुरेश्‍वराचे दर्शन घेत पूजा केला, त्यानंतर त्या बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, राष्ट्रवादीचे बारामतीचे अध्यक्ष संभाजी होळकर, ग्रामपंचायत सदस्य पोपटराव तावरे यांच्यासह राष्ट्रवादीचे विविध कार्यकर्ते, पंचायत समिती अध्यक्ष, सदस्य, विविध पदाधिकारी उपस्थित होते. मोरगाव ग्रामपंचायतच्या सरपंच निलेश केदारी यांनी खासदार सुळेंचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच चिंचवड देवस्थानच्या वतीने मोरगाव मंदिराचे विश्‍वस्त विनोद पवार यांनी खासदार सुळेंचा सन्मान केला.
खासदार सुळे म्हणाल्या की, मुख्यमंत्री एसीमध्ये बसून सरपंचांची चर्चा करतात? दुष्काळाची पाहणी करीत आहेत. मात्र, राष्ट्रवादीने प्रत्यक्षात दुष्काळाच्या ठिकाणी जात पाहणी केली आहे, तसेच दुष्काळ निवारण्यासाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली असल्याचे सांगितले. दरम्यान, मयुरेश्‍वराचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रथम पूजेचा मान त्यांनी दिला व रांगेतच श्रींचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी भाविकांसमवेत सेल्फीही काढल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.