राष्ट्रवादीने गांधीगिरी करत बदलला चुकीचा दिशादर्शक फलक

सासवड- सासवड तालुका पुरंदर येथे सासवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने गांधीगिरी करीत पुरंदरच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा उजेडात आणला आहे. सासवड न्यायालयाच्या कोपऱ्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कडेला दिशादर्शक फलक लावला आहे. त्यावर रस्त्यावरील गावे आणि त्या गावांचे किलोमीटरचा उल्लेख आहे. फलका वरती बालाजी मंदिर ऐवजी बालाजी नगर असा गावाचा उल्लेख केलेला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसने गांधीगिरी आंदोलन करीत चुकीचा दिशादर्शक फलक बदलला आहे.
काही दिवसांपूर्वी दैनिक प्रभातमध्ये पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्‍यात नसलेल्या नवीन गावांचा लावला शोध अशा आशयाची बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारे गांभीर्याने दखल घेतलेली नाही. एक महिना उलटूनही हा चुकीचा दिशादर्शक फलक बदलला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सासवड शहराध्यक्ष राहुल गिरमे व अन्य कार्यकर्त्यांनी गांधीगिरी करीत या दिशादर्शक व सूचना फलकावरील बालाजीनगर हे चुकीचे नाव बदलून बालाजी मंदिर केले आहे. तसेच पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराचा निषेध केला.
राहुल गिरमे म्हणाले की, पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कोणाचे ही नियंत्रण राहिलेले नाही. अधिकारी मनमानी काम करीत असून कार्यालयांमध्ये कोणताही अधिकारी उपस्थित राहत नाही. तसेच त्यांचे फोन सतत नॉन रिचेबल असतात. रिलायन्स जिओ कंपनीने केबल टाकण्याकरिता सासवड-कापुरहोळ रस्त्याची बेसुमार खोदाई करून चाळण केलेली आहे. तरीही पुरंदर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. या रस्त्याची दुरुस्ती त्वरित न झाल्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास टाळे ठोकले जाईल. यावेळी दत्तात्रय जगताप, महेश जगताप, शिवाजी साळुंखे, शैलेश जगताप, नवनाथ बोरावके आदी उपस्थित होते.
सासवड-नारायणपूर-केतकावळे रस्त्यावरील सासवड न्यायालया समोरील कोपऱ्यावर सदर चुकीच्या दिशादर्शक व सूचना फलकाच्या ठिकाणी चारी बाजूने रस्ते एकत्र येत असल्यामुळे तेथे छोटा चौक बनलेला आहे. सदरचे क्षेत्र हे अपघात प्रवण क्षेत्र झालेले आहे. अनेक छोटे-मोठे अपघात या ठिकाणी झाले आहेत. न्यायालयीन कामकाजासाठी पुरंदर तालुक्‍यातील आजूबाजूच्या गावांमधील नागरिक रोज न्यायालयाच्या आवारात वाहने घेऊन येत असतात. या आवारात वाहनांची वर्दळ कायमच असते. तसेच गुरुवारी नारायणपूर देवस्थान, केतकावळे बालाजी मंदिर, पुरंदर किल्ला याठिकाणी जाणारे पर्यटक व भाविकांची गर्दी असते. तसेच शनिवार व रविवारी या रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. त्यामुळे सदर चौकात गतिरोधक बसविण्याची गरज आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)