राष्ट्रवादीच्या उमेदवारीची ‘अतिदक्षता’

शिरूर लोकसभा : आजी माजी लोकप्रतिनिधींसह, कार्यकर्ते ठोस पर्यायाच्या प्रतीक्षेत

राजेंद्र वारघडे


पाबळ -महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातील ‘शिरूर’सह 44 मतदारसंघाचे उमेदवार निश्चित झाल्याचे बोलले जात असताना, शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर का होत नाही? अशी चर्चा या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोर धरत आहे. तर दुसऱ्या बाजूला मागील अनुभवाप्रमाणे यावेळीही उमेदवारीचा निर्णय ‘अतिदक्षता’ विभागात असल्याने या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे.
याच पद्धतीने “येरे माझ्या मागल्याप्रमाणे’ पंधरा दिवसांवर निवडणुका आलेल्या असताना उमेदवार जाहीर होणार का, अशी चर्चा सुरु आहे. या गतीने पुन्हा एकदा हा पक्ष धावपळीतच निवडणुकीला सामोरे जाणार का? असा “विषय’ चर्चेला जोर धरत आहे. दरम्यान मतदार चौकस झाला असल्याने पूर्वीसारखा गृहीत धरून मतदान करील का, याचा विचार करून उपलब्ध माध्यमाधारे पक्षाची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणतीही हालचाल दिसत नाही. या पक्षाची या मतदारसंघात भावी वाटचाल काय असेल याविषयी मतदारांमध्येही संभ्रमावस्था असल्याचे दिसून येत आहे.
विशेष म्हणजे देशपातळीवरील राजकीय पक्षांची एकत्रित मोट बांधण्याचे काम, याच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार करीत आहेत. कोणत्याही परिस्थितीत सत्तास्थान प्राप्त करायचेच अशा पावित्र्यात मोट बांधत असताना दिसत असूनही, याच पक्षाचा उमेदवार जाहीर होत नाही. मतदारांपर्यंत पोहोचायचे कधी, प्रचार यंत्रणा कधी उभी रहायची, उमेदवार कोणता व कोणत्या भागातला असेल या प्रश्नासह, अनेकांची नावे नुसत्या चर्चेत घ्यावी लागत असल्याने चलबिचल वाढली असल्याचे बोलले जात आहे.
शिरूर मतदारसंघाचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून सलग तीन निवडणूका वाढत्या मताधिक्‍याने जिंकताना सर्वसामान्य मतदार महत्त्वाचा हा फॉर्म्युला उपयोगात आणला. तोच फॉर्म्युला घेऊन ते दोन-तीन महिन्यांपूर्वीच सक्रीय होऊन मतदारसंघ पिंजून काढत आहेत. तर विरोधी पक्षाकडून होऊ घातलेल्या टीकेची उत्तरे देताना आत्मविश्वासाने पावले टाकत असताना दिसत असताना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात असलेली ‘अतिदक्षता’ अनेकांना संभ्रमात टाकत आहे. या मतदार संघातील पक्षाचे ज्येष्ठ नेतेही बोलताना ‘उमेदवारीबद्दल’ चकार शब्द न बोलता, राष्ट्रीय राजकारणावर टीका करण्यात समाधान मानत असल्याने उमेदवार कोण? हा प्रश्न मात्र कार्यकर्त्यांना, स्तब्ध करीत असल्याची बोलवा आहे.

कार्यकर्त्यांची मानसिकता तयार व्हावी
शिरूर लोकसभा मतदारसंघात तब्बल तीन वेळा पराभव पत्करावा लागला असला तरी राष्ट्रवादीचा उमेदवार असणार आहे हे “सत्य’. खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, भोसरी व मावळ या विधानसभा मतदारसंघापैकी शिरूर व भोसरी या मतदारसंघातील उमेदवारांची चर्चा होत आहे. मात्र याचवेळी उमेदवार कोणीही असो, पक्ष देईल त्या उमेदवाराला निवडून आणणार, असे सर्वच नेते सांगतात. परंतु कार्यकर्त्यांची मानसिकता तयार करण्याची गरज महत्वाची असताना, व ती अंमलात आणण्यासाठी उपयुक्त असणारी प्रसार माध्यमातूनही काहीच कळत नसल्याने ज्येष्ठ कार्यकर्तेही संभ्रमात आहेत.

आपल्याच मतदारसंघाची काळजी
पूर्वतयारी करताना, व्यक्तीपेक्षा पक्ष महत्वाचा धरून किमान आहे ती “यंत्रणा’ गतिमान करण्यासाठी पावले उचलण्याची गरज असताना, आपल्या अंगावर घोंगडे येऊ न देता, आपल्या मतदारसंघाची काळजी घेत असल्याचे चित्र दिसत आहे, तर पक्षीय पातळीवरही “ठोस’ भूमिकेची वानवा असल्याने पुन्हा एकदा धांदलीतच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष लढणार असल्याचे चित्र दिसत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)