‘राष्ट्रकुल’मध्ये भारतीय महिलांचा दबदबा !

अमित डोंगरे

‘म्हारी छोरीया छोरोंसे कम है के’ हा दंगल चित्रपटातील संवाद राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रीडापटूंनी अक्षरशः सार्थ ठरवला. या स्पर्धेत भारताने मिळवलेल्या एकूण पदकांत महिलांनी मिळविलेल्या पदकांची टक्केवारी ऐंशीच्या जवळपास आहे. पुरुष खेळाडूंपेक्षा महिला खेळाडू या स्पर्धेत सर्वांत जास्त यशस्वी ठरल्याचेच ही आकडेवारी सांगते.

स्पर्धेची सुरुवातच दिमाखात करताना वेटलिप्टींग क्रीडाप्रकारात मीराबाई चानुने 46 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तर पुरूष गटात गुरूराजने रौप्यपदकाला गवसणी घातली. स्पर्धेत दुसऱ्या दिवशी संजिता चानुने 53 किलो गटात सुवर्णपदकाची कमाई केली. त्यानंतर पंचवीस वर्षीय सतीश शिवलिंगम आणि केवळ एकवीस वर्षांच्या वेंकट राहुलने सुवर्णपदके पटकावत वेटलिप्टींगमधील भारताचे वर्चस्व कायम राखले.

स्पर्धेचा पहिला रविवार भारतासाठी ‘सुपर संडे’ ठरला. सिंगापूरच्या टेबल टेनिसमधील वर्चस्वाला मोडीत काढत भारतीय महिला संघाने सुवर्णपदक जिंकले. सोळा वर्षीय नेमबाज मनु भाकर हिने वरिष्ठ खेळाडू व देशभगिनी हिना सिद्धू हिच्यापेक्षा सरस कामगिरी करत नेमबाजीतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. वेटलिप्टींगमधील दबदबा कायम राखताना पुनम यादवने सुवर्णपदकाची कमाई केली. रवीकुमारने दहा मीटर एअर रायफल नेमबाजीत ब्रॉंझपदक मिळवले. विकास यादवनेही पदक तालीकेत भर घालताना वेटलिप्टींगमध्ये ब्रॉंझ पदकाची नोंद केली. मनु भाकरच्या सुवर्णाला एक यशाची किनारही लाभली. तिने हिना सिद्धूला रौप्यपदकावर समाधान मानायला लावले. एका महिन्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध स्पर्धेत मिळून हे तिचे सातवे सुवर्णपदक ठरले.

बॅडमिंटन स्पर्धेत भारताने मिश्र सांघिक गटात सुवर्णपदक जिंकले. यावेळी स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी दुहेरीत न खेळताही भारताने हे यश मिळवले हे सर्वात महत्वाचे. त्याच दिवशी नेमबाजीत जितु रायने दहा मीटर एअर पिस्तुलमध्ये सुवर्ण, तर ओमने ब्रॉंझ पदक जिंकले. भारतीय नेमबाजांनी पहिल्या दोन दिवसांत एकूण सात पदकांची कमाई केली. अपूर्वी चंडेलाने ब्रॉंझ, मेहुली घोषने रौप्यपदक जिंकले. तिकडे वेटलिप्टींगमध्ये धडाका कायम राखताना प्रदीप सिंगने 105 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. भारताच्या टेबल टेनिस संघानेही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदकांचा दुष्काळ संपवला. या संघाने बारा वर्षानंतर या स्पर्धेत सांघिक गटात सुवर्णपदक जिंकताना नायजेरियावर मात केली.

पिस्तुल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागलेल्या हिना सिद्धूने रायफल प्रोन प्रकारात मात्र वर्चस्व राखताना सुवर्ण पदकाची कमाई केली. या प्रकारात सर्वाधिक आशा असलेल्या चैन सिंग आणि गगन नारंग यांनी मात्र घोर निराशा केली. एकीकडे महिला क्रीडापटू वर्चस्व गाजवत असताना पुरुष खेळाडूंचे अपयश जास्तच अधोरेखीत होत होते. समाधानाची बाब म्हणजे प्रमुख खेळाडू अपयशी ठरत असताना पॉवर लिप्टींगमध्ये पॅरा पॉवरलिप्टर सचिन चौधरीने ऐतिहासिक कामगिरी करताना ब्रॉंझ पदक मिळवले. भारताच्या श्रेयानी सिंग हिने नेमबाजीत डबल ट्रॅपमध्ये सुवर्ण पदकाचा वेध घेतला व जाणकारांना अचंबित केले. याच गटात पुरूष विभागात अंदुर मित्तलने ब्रॉंझपदक पटाकवले. नेमबाजीतच तेजस्विनी सावंतने रौप्य पदकाची कमाई करत देशाने या क्रीडा प्रकारातील वर्चस्व कायम राखले. कुस्तीमध्ये भारताने चार पदके पटकावत चौकार मारला. मराठमोळा कुस्तीगीर राहुल आवारे याने 57 किलो फ्री स्टाईल गटात सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेच्या सुरुवातीलाच कुस्तीमध्ये आवारेकडूनच पदकाची आशा केली जात होती आणि त्याने ती पूर्ण केली. सुशील कुमारने राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे सुवर्णपदक पटकावताना ऐतिहासिक कामगिरी केली. महिला गटात बबीता फोगटने 53 किलो गटात रौप्य तर किरणने 76 किलो वजनी गटात ब्रॉंझपदक मिळवले.

थाळीफेकीत सीमा पुनियाने रौप्यपदकाला गवसणी घातली. याच गटात नवज्योत ढिल्लोनने ब्रॉंझ पदकाची कमाई केली. सिमा पुनियाचे राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासातील हे चौथे पदक ठरले. तिने 2014 च्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते, यंदा मात्र तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतने नेमबाजीतील यश कायम राखत पन्नास मीटर रायफल थ्री पोझीशन प्रकारात सुवर्णवेध घेतला, तर अंजुम मुदगीलने रौप्यपदक मिळवले. केवळ पंधरा वर्षीय अनिष भानवालने याच प्रकारात पुरुष गटात सुवर्णपदकाची कमाई करत सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्‍का दिला.

टेबल-टेनिसमध्ये महिला दुहेरीत मात्र मौमा दास आणि मनिषा बात्रा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कुस्तीमध्ये भारताच्या बजरंग पुनियाने 65 किलो गटात सुवर्णपदक पटकावत वर्चस्व राखले. त्याचबरोबर पूजा धांडा आणि मौसम खत्री यांनी रौप्य पदकाची कमाई केली तर दिव्या माकरन हिने ब्रॉंझ पदक मिळवले. मुष्टीयुद्धातही भारताने पदकांचा धडाका कायम राखला. नमन तन्वरने हेवीवेट गटात ब्रॉंझपदक, मनोज कुमारने वेल्टरवेट गटात ब्रॉंझ पदक तर मोहम्मद इसामुद्दीनने 56 किलो वजनी गटात ब्रॉंझ पदक पटकावले.

सुपर मॉम मेरी कोमचे यश
भारताची अव्वल मुष्टीयुद्ध खेळाडू व ‘सुपर मॉम’ मेरी कोम हिने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने स्पर्धा गाजवली. तीन मुलांची आई असलेली मेरी कोम हिची कारकीर्द संपली अशा चर्चा स्पर्धेपूर्वी सुरू होत्या त्या तिने एका क्षणात संपवल्या. पाच वेळची जगज्जेती आणि ऑलिंपीक पदक विजेती मेरी कोम या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठीच केवळ सहभागी झाली नव्हती तर अजूनही आपले लक्ष्य ‘टोकीयो 2020’ आहे हेच सिध्द करायला सज्ज झाली होती. तिने अंतिम फेरीत उत्तर आयर्लंडच्या क्रिस्टिना ओहाटावर 5-0 अशी मात करत सुवर्ण पदक जिंकले. मेरीबरोबरच पुरूष गटात गौरव सोलंकी आणि विकास कृष्ण यांनीही सुवर्ण पदकाची कमाई केली. नेमबाजीत संजीव राजपूतने पन्नास मीटर रायफल थ्री पोझीशनमध्ये तर निरज चोप्राने भालाफेकीत देशाला सुवर्णपदक जिंकून दिले. कुस्ती प्रकारात सुमीतने 125 किलो गटात तर विनेश फोगटने महिला गटात पन्नास किलो गटात सुवर्ण जिंकले.

मनिषा बात्राचे ऐतिहासिक यश
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये मनिषा बात्राने ऐतिहासिक कामगिरी केली. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत तिने सिंगापूरच्या मेंगई यु हिच्यावर 11-7, 11-6, 11-2, 11-7 अशी मात केली. एकेरीचे सुवर्णपदक पटकावणारी मनिषा बात्रा भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. यंदाच्या स्पर्धेतील तिचे हे तिसरे पदक ठरले. एकेरी, सांघिक आणि महिला दुहेरी अशा तीन प्रकारात तिने पदक मिळवले. कुस्तीत विनेश फोगट आणि सुमीत मलीक यांनी सुवर्ण पदके पटकावली तर ऑलिंपीक पदक विजेती साक्षी मलीक हिने आणि सोमवीर यांनी अनुक्रमे महिला आणि पुरूष गटात ब्रॉंझ पदकांची कमाई केली.

हॉकी संघांनी आत्मपरीक्षण करावे
सलग तिसऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा महिला हॉकी संघ पदकाविना परतणार आहे. केवळ महिला संघच नव्हे तर यंदा पुरूष संघालाही अपयशाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही खरेतर ‘आशियाई’ आणि ‘टोकियो 2020’ या स्पर्धेची रंगीत तालीम ठरणार होती पण भारताच्या दोन्ही संघांची कामगिरी पाहून असे वाटतच नव्हते की त्यांच्या खेळात काही गांभीर्य आहे. केवळ परदेशी प्रशिक्षक नेमला म्हणजे खेळ उंचावेल हा समज या स्पर्धेने दूर केला हे एक बरे झाले. भारतात आधुनिक ध्यानचंद धनराज पिल्ले असताना इतर कोणाला प्रशिक्षक का नेमतात आणि मग काय हाते हे या स्पर्धेने दाखवून दिले.

सायनाला सुवर्ण, सिंधू आणि श्रीकांतला रौप्य
फुलराणी सायना नेहवालने महिलांच्या बॅडमिंटन स्पर्धेतील एकेरीच्या अंतिम सामन्यात आपलीच देशभगिनी व ऑलिंपिक रौप्यपदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधू हिचा पराभव केला आणि सुवर्ण पदक जिंकले. सायनाने हा सामना 21-18, 23-21 असा सरळ जिंकला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात अव्वल मानांकित खेळाडू किदाम्बी श्रीकांतला मात्र सुर हरवल्याने रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले. राष्ट्रकुल स्पर्धेतील इतिहासातील त्याचे हे पहिलेच पदक ठरले. पुरूष दुहेरीत सात्वीक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने देखील सरस कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली.

स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने स्क्‍वॅश आणि टेबल टेनिसमध्येही पदकांची कमाई केली. दिपीका पल्लीमल आणि जोत्स्ना चिनाप्पा या जोडीने स्क्‍वॅशमध्ये रौप्यपदक जिंकले. टेबल टेनिसमध्ये अव्वल खेळाडू अचंता शरथ कमालने ब्रॉंझ पदक पटकावले तर मिश्र दुहेरीत मनिषा बात्रा आणि जी. साथीयान जोडीनेही ब्रॉंझ पदकांची कमाई केली. भारताने या स्पर्धेत 26 सुवर्ण, 20 रौप्य आणि 20 ब्रॉंझ अशी एकूण 66 पदके मिळवत पदक तालीकेत तिसरे स्थान राखले. आता भारतीय खेळाडूंनी आशियाई आणि ‘टोकीयो 2020’ची रंगीत तालीम चांगलीच यशस्वी केली. आशियाई स्पर्धा येत्या सप्टेंबरमध्ये होणार असून राष्ट्रकुलचा कित्ता तिथेही गिरवला तर खऱ्या अर्थाने भारतीय खेळाडू ऑलिंपिकला सज्ज होतील. या पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीची दखल भारतातील सर्व राज्य सरकारांनी घेतली व रोख रकमेच्या पुरस्कारांची घोषणाही केली आहे. त्यामुळे आता खेळाडू केवळ पदक विजेते न राहता लक्षाधीशही बनणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)