रावेत बंधाऱ्याचे आता “ड्रोन सर्व्हेक्षण’

 

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पवना नदीवरील रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खाली नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्यात प्रभावित पाणलोट क्षेत्रात पाण्याची धोकादायक पातळी तपासणे आवश्‍यक आहे. त्यासाठी “ड्रोन सर्व्हेक्षण’ करण्यात येणार आहे. त्यासाठी साडेपाच लाख रूपये खर्च केला जाणार आहे. त्याचबरोबर रावेत बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी 3 लाख, 68 हजार 266 रुपये खर्च करण्यात येईल. अशाप्रकरणे एकूण 9 लाख, 18 हजार 266 रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.

तात्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन रावेत बंधारा बांधण्यात आला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत जलदगतीने विकास होत आहे. बंधाऱ्याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्य:स्थितीत बंधाऱ्यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 30 एमएलडी जलउपसा केला जातो.
हा बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतात. ब्रिटीशकालात हा बंधारा बांधला असल्याने सद्य:स्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी आहे. त्याबाबत त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांनाही सूचित केले आहे. सध्या पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असल्याने बंधाऱ्यातील पाणी पातळी खाली जात आहे. त्याचा ताण उपसा सिंचनावर होऊन पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यात झालेल्या बैठकीत पाणलोट क्षेत्राचे सर्व्हेक्षण महापालिकेमार्फत करण्याचे ठरले आहे. या सर्व्हेक्षणात बंधाऱ्याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे.

याबाबत निविदा न काढता सर्वात कमी दर सादर केलेल्या ठेकेदाराला सर्व्हेक्षणाचे काम देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार पाच लाख 50 हजार रूपये हा लघुत्तम दर सादर करणाऱ्या राहुल देशमुख यांना निविदा न मागविता करारनामा करून थेट पद्धतीने काम देण्यात येणार आहे. या कामासाठी 2018-19 च्या अंदाजपत्रकातील “पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ या लेखाशिर्षाअंतर्गत “रावेत येथील जुन्या बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे’ या कामाअंतर्गत उपलब्ध तरतूद पाच लाख रूपये इतकी आहे. याशिवाय रावेत बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी 3 लाख 68 हजार 266 रुपये खर्चास ऐनवेळी मान्यता देण्यात आली.

पाणी साठवण क्षमतेत होणार वाढ
रावेत बंधाऱ्यातील गाळ काढल्याने पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याचा उपसा करत पाण्याची पातळी समान ठेवण्यात मदत होणार आहे. यापूर्वी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून पवना धरणातील गाळ काढण्यात आला होता. या सर्वांचा फायदा शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.