राळगेणसिद्धीत सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

सरकारकडून तिसऱ्या दिवशीही दखल नाही ः पारनेरकर आज पाळणार बंद

पारनेर – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रात लोकपाल व राज्यात लोकायुक्त नियुक्त करावा, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोग लागू करावा, या मागण्यांसाठी मागील तीन दिवसांपासून उपोषणास बसले आहेत. मात्र अद्यापही सरकारकडून त्याची कोणतीही दखल घेतली गेली नसल्याने राळेगणसिद्धी परिवारने आज सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी उपसरपंच लाभेश औटी व अण्णांचे माजी स्वीय सहाय्यक सुरेश पठारे यांच्यासह मोठ्या संख्येने आंदोलक उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे राळेगण सिद्धी येथे ग्रामस्थांच्या वतीने सकाळी दहन करण्यात आले. त्यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मलिक यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे परिवर्तन यात्रेनिमित्त आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची भेट अण्णा हजारे यांनी नाकारली होती. याप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मलिक यांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

राळेगणसिद्धी येथे अण्णांच्या उपोषणाचा तिसरा दिवस असून, राज्यातून अनेक ठिकाणांवरून लोकांनी येथे येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. तिसऱ्या दिवशी साडेतीन किलोंनी अण्णांचे वजन घटले असून, शुगर वाढलेली आहे अण्णा आता एक दिवसापर्यंत उपोषण करू शकतात. अन्यथा त्यांची तब्येत आनखी ढासळण्याची शक्‍यता डॉ. धनंजय पोटे यांनी व्यक्त केली. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पारनेर ग्रामस्थांच्या वतीने उद्या (दि.2) पारनेर शहरात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, असिम सरोदे यांनी आज अण्णांची भेट घेऊन आंदोलनात सहभाग घेतला.
अण्णांबरोबर राळेगणसिद्धीचे उपसरपंच लाभेश ओटी उपोषणास बसले असून, जोपर्यंत अण्णा उपोषण करतील, तोपर्यंत त्यांना साथ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here