रायरी माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांचे पगार रखडले

पाच महिन्यांपासून शिक्षकांची आर्थिक ओढाताण

भोर- तालुक्‍यातील अतिदुर्मग डोंगरी भागातील रायरी येथे भोर एज्युकेशन सोसायटी संचालित रायरी माध्यमिक विद्यालय असून या विद्यालयातील शिक्षकांचे डिसेंबर 2018 पासून पगारच झाले नाहीत. त्यामुळे शिक्षकांना गेल्या पाच महिन्यांपासून आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांचे गृह कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, सोसायट्यांची हप्ते थकले असून हातउसणवारी करुन त्यांना घर प्रपंच चालवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर थकीत पगार द्यावा, अशी मागणी शिक्षकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष व सचिव यांना निवेदन दिले देण्यात आले आहे. तसेच शिक्षकांनी पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून त्यांनाही निवेदन देण्यात येणार आहे. या बाबतची माहिती अशी की, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. जी. सूर्यवंशी हे 28 फेब्रुवारी 2018 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्यानंतर विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक व्ही. बी. वाघ यांना विद्यालयाचे कामकाज पाहण्याचे अधिकार मार्च 2018 पर्यंतच देण्यात आले होते. त्यानंतर त्यांचे अधिकार 30 नोव्हेंबर 2018 रोजी संपुष्टात आले असल्याने विद्यालयाचे शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी यांचे पगार बिले सही अभावी पाठवली गेली नाहीत.

त्यांचे डिसेंबर 2018 ते एप्रिल 2019 असे पाच महिन्यांचे वेतन थकले असल्यामुळे विद्यालयाच्या शिक्षकांसह कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. या विषयी संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष विजय रावळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला ते म्हणाले की, मला निवेदन मिळाले नाही. मात्र, सर्व कर्मचाऱ्यांचे पगार काढण्याचे अधिकार व्ही. बी. वाघ यांच्याकडे कायम केले असून तसे पत्र मी शिक्षकांना सोमवारीच देत आहे.

  • खुलाशाला अद्याप उत्तर नाही
    गेल्या पाच महिन्यांपासून रायरी विद्यालयाचे शिक्षक व कर्मचाऱ्यांचे पगार रखडले असून या विषयी या कर्मचाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली. शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेला या पूर्वीच दोन पत्रे पाठविली आहेत. त्याचे उत्तर अद्याप मिळालेले नसून या विद्यालयाच्या मुख्याध्यापकाचे समायोजन करणे आवश्‍यक होते. मात्र, तेही संस्थेने केले नसून त्याचा खुलासा मागवला आहे असल्याचे या शिक्षकांना शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.