राममंदिराच्या कामास प्रारंभ; सपाटीकरण करताना आढळल्या पुरातन मूर्ती आणि नक्षीदार खांब

अयोध्या- सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम जन्मभूमी-बाबरी मशीदचा वाद मिटला असून श्री रामजन्मभूमी येथे मंदिर उभारणीच्या कामास सुरुवात झाली आहे. लॉकडाऊननंतर आता येथे जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू झाले आहे. यावेळी केलेल्या उत्खननात मंदिराचे अवशेष सापडले आहेत. यात प्राचीन दगडांचे खांब, विहिरी आणि मंदिर चौकटींचे अवशेष सापडले आहेत.

देशात करोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सर्व कामे ठप्प होती. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने बांधकामांना परवानगी दिल्यानंतर मागील दहा दिवसांपासून अयोध्येत राम मंदिराच्या कामाला पुन्हा सुरुवात झाली आहे. राममंदिराच्या उभारणीसाठी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापन केला होता. या ट्रस्टच्या देखरेखीखाली मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे.

दरम्यान, अयोध्येतील राममंदिर उभारण्यात येणाऱ्या नियोजित ठिकाणी जागेचे सपाटीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी खोदकामही करण्यात आले असून, खोदकामावेळी अनेक मूर्ती आणि ऐतिहासिक खांब आढळून आले आहेत, अशी माहिती विश्‍व हिंदू परिषदेचे नेते आणि रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी दिली.

ते म्हणाले, सध्या मंदिर उभारणीच्या कामासाठी जमिनीच्या सपाटीकरणाचे काम सुरू आहे. यादरम्यान काही ऐतिहासिक वस्तूंचे अवशेष सापडले. यात देवी-देवतांच्या मूर्ती, पुष्पकलश आणि नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचबरोबर शिवलिंगही सापडले असून, कुबेर तिलासारखी वस्तू सापडली आहे.

दरम्यान, शतकाहून अधिक काळ चाललेल्या अयोध्येतील राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने 9 नोव्हेबर 2019 रोजी ऐतिहासिक निकाल दिला. वादग्रस्त जागेवर राममंदिराचे निर्माण करण्यात यावे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन करण्यात यावा. त्याचबरोबर मशीद उभारण्यासाठी अयोध्येत मोक्‍याच्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा निकाल दिला होता. त्यानंतर सरकारने न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काम सुरू केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.