राफेल प्रकरणावरून राहुल यांचे मोदींवर नव्याने आरोप

अमेठी – राफेल विमान व्यवहाराराशी संबंधित अन्य काही तपशील लवकरच उजेडात येईल. विजय मल्ल्याशी संबंधित काही नवीन माहितीही लवकरच उजेडात येईल, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कैलास मानसरोवर यात्रेनंतर अमेठी या लोकसभा मतदारसंघात दोन दिवसांच्या दौऱ्यावर ते आले आहेत.

देशाच्या चौकीदाराच्या गैरव्यवहारांना उजेडात आणण्याची ही तर एक सुरुवात आहे. अजून बरीच प्रकरणे बाहेर यायची आहेत. राफेल विमानांची किंमत जाहीर का करण्यात आली नाही. अनिल अंबानींना कंत्राट कसे दिले गेले आणि फ्रान्सच्या माजी अध्यक्ष ओलांद यांच्याकडून गंभीर आरोप कसे झाले, याची उत्तरे पंतप्रधानांनी द्यायला हवी. संसदेमध्ये राफेल व्यवहारावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान आपल्या डोळ्यास डोळे भिडवून बघूही शकत नव्हते. पंतप्रधानांना भाषण देता येते मात्र त्यांच्याकडे उत्तर नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रश्‍नांना उत्तर देण्याचे धारिष्ट्य त्यांच्याकडे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.
भाजपच्या सरकारच्या काळात शेतकरी आणि गरिब जनता रडत आहे. निवडक 5-10 लोकांना सध्याच्या सरकारकडून सर्व लाभ दिले जात आहेत, असे सांगून अनिल अंबानी, विजय मल्ल्या आणि ललित मोदी यांच्या नावांचा उल्लेख राहुल गांधी यांनी केला. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने मात्र कोट्यवधी रुपयांचा लाभ झाल्याचा राहुल गांधी यांचा आरोप फेटाळला आहे.

देशांतील कंपनीच्या सहभागातून विमान उत्पादन करण्याची अट पूर्ण करण्यासाठी फ्रेंच कंपनी दासॉल्टबरोबर रिलायन्स डिफेन्स मिळून राफेल विमानांच्या उत्पादनाचा करार केला गेला आहे. या करारातून अमेठीतील इंजिनिअरना रोजगार मिळू शकला असता. पंतप्रधान झाल्या झाल्या मोदी थेट फ्रान्सला गेले आणि त्यांनी हा करार बदलला. हिंदुस्थान एरोनॉटिकला विसरा, आता रिलायन्सला कॉन्ट्रॅक्‍ट दिले असे ते म्हणाले, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला.
राफेल, विजय मल्ल्या, ललित मोदी, नोटबंदी आणि जीएसटी या एकापाठोपाठ एक प्रकरणांवरून मोदी हे चौकीदार नाही, तर चोर असल्याचे सिद्ध केले जाईल, असे राहुल गांधी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)