रात्री व्हिस्की पिण्याची ईच्छा पडली 26 हजाराला

रात्री व्हिस्की पिण्याची ईच्छा पडली 26 हजाराला
पुणे,दि.18- व्हिस्की पिण्याची ईच्छा हडपसर येथील एकाला चांगलीच महागात पडली. रात्री वाईन शॉप बंद असल्याने व्हिस्कीची होम डिलिव्हरी मागवण्यात आली. मात्र पेमेंटच्या नावाखाली डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन बॅंक खात्यातून 26 हजार 652 रुपये काढून घेण्यात आले.
याप्रकरणी दिव्येश जयेशकुमार पाठक(रा.महंमदवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानूसार आयटी ऍक्‍ट अंतर्गत फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीला रात्री व्हिस्की पिण्याची ईच्छा निर्माण झाल्याने त्यांनी गुगलवर कोणते वाईन शॉप सुरु आहे हे सर्च केले. त्यांना मगरपट्टा हडपसर येथील सनी वाईन शॉप सुरु असल्याचे समजले. त्यांनी संबंधीत नंबरवर संपर्क केला असता, समोरील व्यक्तीने शॉप बंद झाले आहे, होम डिलिव्हरी मिळेल असे सांगितले. तर पेमेंटसाठी डेबीट कार्ड आणी मोबाईलवर आलेला ओटीपीची माहिती काढून घेतली. माहिती घेतल्यावर त्याने फिर्यादीच्या खात्यातून ऑन लाईन पध्दतीने 26 हजार 652 रुपये काढून घेतले. फिर्यादीला पैसे निघाल्याचा बॅंकेचे मेसेज आल्यावर त्यांनी संबंधीत क्रमांकावर संपर्क साधला. मात्र संबंधीत क्रमांक बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.