राज्य सरकारकडून ओबीसी नेतृत्व संपविण्याचे प्रयत्न – बाळबुधे

नेवासे  – सत्तेत असतांना मंडल आयोग लागू करून शरद पवारांनी ओबीसी -अल्पसंख्यांकांना शिक्षणात, नोकरीत आणि सत्तेत आरक्षण दिले. परंतु आज राज्यात सत्तेत असलेले भाजप सरकार छगन भुजबळांसारखे ओबीसी नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका राष्ट्रवादी इतर मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी केले.
कुकाणा येथील साईश्रद्धा मंगल कार्यालयात आयोजित नेवासा तालुक्‍यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस ओबीसी सेल कार्यकर्ता बैठकीत बाळबुधे बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे अध्यक्षस्थानी होते. राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटी, जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काशीनाथ नवले, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष भाऊसाहेब जावळे, एकनाथ कावरे, डॉ. अशोकराव ढगे उपस्थित होते.
बाळबुधे म्हणाले, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यानंतर आठरापगड जाती, अल्पसंख्यांक, ओबीसी यांचा कोणी विचार केला असेल तर तो शरद पवारांनी.भाजप सरकार राज्यात जातीवाद पेरण्याचे काम करीत आहे. मराठा, धनगर, मुस्लिम बांधवांना आरक्षण देतो, म्हणत फक्त झुलवत ठेवल आहे. शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही म्हणून शिक्षण थांबविण्याची वेळ आली. काही तरी चांगले होईल. या भावनेतून लोकांनी मोदींना भरभरून मते दिली, परंतु मोदींकडून लोकांना असलेली अपेक्षा फोल ठरली आहे. देशाची आणि राज्याची आर्थिक पत खालावलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये खून, बलात्काराचे प्रमाण वाढतच आहेत. ज्यांना नागपूर सुरक्षित ठेवता येत नाही ते महाराष्ट्र कसे काय सुरक्षित ठेवतील? केंद्रातील आणि राज्यातील सरकारकडून जनतेचा भ्रमनिरास झाल्याने भाजपच्या मंत्र्यांच्या गावात आता सत्ता परिवर्तन होऊन कॉंग्रेस सत्तेवर येत आहे.
अभंग म्हणाले, शरद पवार आणि छगन भुजबळ यांनी अल्पसंख्याक, ओबीसीसाठी मोठे काम केलेले आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार समाजातील सर्व घटकापर्यंत पोहचवून त्यांना न्याय दिला. या सरकारच्या काळात महागाईच्या आगीत जनता होरपळत आहे. पेट्रोल-डिझेल भाववाढीचा आगडोंब उसाळलेला आहे. शेती कर्जमाफीच्या निकाशातच शेतकरी बेजार झालेला आहे. राज्यात अस्थिर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
लंघे म्हणाले, नेवासा तालुक्‍यात पक्ष फुटीमुळे निर्माण झालेली पोकळी नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील यांचे नेतृत्वाखाली भरून निघत आहे.पक्षवाढीसाठी तालुक्‍यात जोमाने प्रयत्न सुरू आहेत.लवकरच ओबीसींसेलचा मोठा मेळावा घेण्यात येईल.
यावेळी ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक जनार्दन पटारे, डॉ. नारायण म्हस्के, राजेंद्र मते, रावसाहेब निकम, कामगार संचालक बापूसाहेब सुपारे, भाऊसाहेब चौधरी, राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष दादा गंडाळ, प्रदेश सरचिटणीस गणेश गव्हाणे, युवक तालुकाध्यक्ष नवनाथ साळुंके, भीमराज शेंडे, अमोल अभंग, शंकर भारस्कर, गोरक्षनाथ कापसे, गुलाबराव आढागळे, अर्जुन कापसे, सोपान महापूर, बलभीम फुलारी, सोपान शेंडगे, ज्ञानेश्वर वाघुले, शंकर निकम, तुळशीराम तुपे, भाऊसाहेब नवथर, अनिल पंडित आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)