राज्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी

मान्सून देशाच्या सिमेवर पोहचला
मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज
किनारपट्टीवर अतीदक्षतेचा इशारा

पुणे-  अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्याने आज विदर्भातील अनेक भागात वीजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उद्यापासून(मंगळवार) वादळी पावसाची शक्‍यता आहे. दरम्यान केरळच्या दक्षिणेस आणि देशाच्या सिमेवर मान्सून दाखल झाला असून येत्या 48 तासात तो दाखल होईल. असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
केरळ आणि कर्नाटकच्या किनाऱ्यांलगत असलेल्या कमी दाबाचे क्षेत्राची तीव्रता वाढत असल्याने या भागात ढगांनी दाटी केली आहे. पश्‍चिम किनाऱ्यालगत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. अरबी समुद्रात उंच लाट उसळून समुद्र खवळणार असल्याने केरळ, कर्नाटकच्या किनारपट्टीलगत मासेमारीसाठी जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात ढग गोळा होत असल्याने पावसाला पोषक वातावरण होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांत वादळी वारे, विजांच्या कडकडाटांसह पूर्वमोसमी पावसाने दणका दिला. तर सिंधुदर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर जिल्ह्यांत पाऊस झाला. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समजते. नांदेड, हिंगोली जिल्ह्यांत जोरदार पावसामुळे जलयुक्त शिवारच्या अभियानातून करण्यात आलेल्या बंधाऱ्यांमध्ये पाणी जमा झाले आहे. या पावसामुळे खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला वेग येणार आहे. पूर्वमोसमी पावसामुळे नांगरट केलेल्या शेतातील मातीचे ढेकूळ फुटल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे. विदर्भातही वादळी वाऱ्याने झाडपडीच्या आणि घराचे पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. ढगाळ हवामानामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार होत आहेत.

मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हवामानात बदल झाला असून ढगाची दाटी आकाशात जमा झाली आहे. कोकणात सुद्धा काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. उद्यापासून (मंगळवार)मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात वीजेच्या कडकडाटास मान्सून पुर्व पाऊस पडणार आहे. पुणे शहरातही आज सकाळ पासून ढग जमा झाले होते पण पावसाने हजेरी लावली नाही. संध्याकाळी मात्र आकाशात ढग गोळा झाला होते तसेच वारे ही वाहू लागले होते.

मान्सूनने शुक्रवारी (ता.26 ) दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. रविवारी मान्सूनने अंदमान बेटांवरील मायाबंदर आणि श्रीलंकेच्या दक्षिण किनारपट्टीपर्यंतचा टप्पा पार केला होतो. दक्षिण अरबी समुद्र,मालदीव-कोमोरीन भाग, दक्षिण बंगालच्या उपसागराचा आणखी काही भागांत मॉन्सून दाखल झाला असल्याचे सांगण्यात आले. मंगळवारपर्यंत मालदीव-कोमोरीनचा संपूर्ण भाग, अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मॉन्सून पोहचण्याची शक्‍यता आहे. तर येत्या दोन दिवसात मान्सून केरळात दाखल होण्यास पोषक वातावरण असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

केरळ किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र
केरळ-कर्नाटकच्या किनाऱ्यालगत असलेल्या अरबी समुद्रात रविवारी (ता. 27) कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, ते सोमवारीही कायम होते. या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे केरळ, कर्नाटक किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली असून, मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)