राज्यात महायुती 250पर्यत मजल मारणार – चंद्रकांत पाटील

कोल्हापूर :लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सरकार स्थापन झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या तीन मोठ्या निर्णयांचे लोकांना अप्रूप आहे. त्यामुळे महायुतीचे “अब की बार 220 पार’ हे आता 250 टचपर्यंत मजल मारणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील दहाच्या दहा जागा महायुतीच्या येतील, असा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत दूरदृष्टीचे आणि संयमी आहेत. तेच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालकमंत्री पाटील यांनी दुपारी पावणेचारच्या सुमारास तपोवन परिसरातील शीलादेवी डी. शिंदे सरकार हायस्कूलमधील मतदान केंद्रात येऊन मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, कोथरुडमध्ये मी स्वत: विधानसभेचा उमेदवार असूनही सकाळ पूर्ण कोथरुडमध्ये दिली. तेथील सर्व केंद्रांवर जाऊन मतदारांना भेटून मी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी कोल्हापूरला आलो.

पुणे, मुंबईतील नोकरदार मतदानासाठी बाहेर पडले. यावेळी एकूण चित्र पाहता महाराष्ट्रातील निवडणूक लोकांनी हातात घेतली आहे. 1 कोटी 70 लाख लोक असे आहेत की, ज्यांना सरकारकडून काही ना काही लाभ मिळाला आहे. त्यामुळे ते नतद्रष्ट नाहीत. आपला कोणी मित्र उभा आहे म्हणून ते भाजप-शिवसेनेशी गद्दारी करणार नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्रातील 58 पैकी 50 जागा युती जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

परळीबाबत बोलायचे झाले, तर इतक्‍या खालच्या पातळीला महाराष्ट्रातील राजकारण आणि प्रचार येणे योग्य नाही. बहीण-भावाचे नाते राजकारणामुळे बिघडणार असेल, तर ते चांगले नाही. त्यामुळे मी आणि मुख्यमंत्र्यांनी परळीतील या प्रकाराबाबत निषेधाचे संयुक्त पत्रक काढले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.