राज्यात बाप्पाचे विसर्जनाची लगबग…

बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न होण्यासाठी 50 हजार पोलिस तैनात

मुंबई : आज दहा दिवसानंतर आपल्या लाडक्‍या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न व्हावे यासाठी राज्यातील भक्‍तगण सज्ज झाले आहेत. तसेच पोलीस प्रशासनासह मुंबई महानगरपालिकाही सज्ज झाली आहे. मुंबईतील 129 ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 32 ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्थादेखील करण्यात आली आहे.

पोलीस आणि महानगरपालिकेच्या जोडीला काही खासगी संस्थाही मदतीसाठी सज्ज झाल्या आहेत. तसेच पालिकेच्यावतीने धोकादायक ब्रीजवरून गणपती विसर्जनाच्या मिरवणुका न काढण्याच्या विशेष सुचना दिल्या आहेत. दरम्यान, गणपती विसर्जन सुरळीत व्हावे यासाठी 50 हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसंच पोलीसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्‍यूआरटी, फोर्स वन, रॅपिड ऍक्‍शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, 5 हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक ठिकाणांवर नजर ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त सुरक्षेसाठी काही पोलीस साध्या वेशातही तैनात करण्यात आले आहेत. तसेच विसर्जनादरम्यान आपल्या पाल्यांवर विशेष लक्ष देण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मुंबईतील 53 रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. तसेच वाहतुककोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणूक आणि वाहनचालकांची गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील मार्गामध्ये बदल करण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त 99 ठिकाणी पार्किंगही बंद करण्यात आली आहे. विसर्जनादरम्यान होणारी गर्दी पाहता मेडिकल सेंटर्स, वॉच टॉवर्स उभारण्यात आले आहेत. तसेच हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठीही एक विशेष सेंटर सुरू करण्यात आले आहे. सुरक्षेसाठी ड्रोन कॅमेऱ्यांची मदतही घेण्यात येणार आहे. विसर्जन करताना खोल पाण्यात न जाण्याचे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.