राज्यात धनुष्यबाण आणि कमळाची हवा – आदित्य ठाकरे

शिरूरमधून युतीचे आढळराव पाटील यांचा अर्ज दाखल

पुणे-लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील अनेक भागात जाऊन महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरत आहे. राज्यात धनुष्यबाण आणि कमळाची हवा आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीचेच उमेदवार विजयी होतील, अशा विश्‍वास युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित दाखल करण्यात आला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पालकमंत्री व पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गिरीश बापट, खासदार अनिल देसाई, राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार डॉ. नीलम गोऱ्हे, बाबुराव पाचर्णे, सुरेश गोरे, महेश लांडगे, योगेश टिळेकर, पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव, जिल्हा परिषद गटनेत्या आशा बुचके, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आदी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आढळराव पाटील म्हणाले, यंदाची लोकसभेची ही माझी चौथी निवडणुक असून आजपर्यंत मी चढत्या मताधिक्‍याने विजयी होत आलो आहे. यंदा चार ते पाच लाख मतांनी विजयी होईल. आघाडी सरकारने शिरूर व पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याची असलेली बैलगाडा शर्यत बंद पाडली; परंतु राज्य व केंद्र शासनाने बैलगाडा शर्यतीबाबत कायदा केला आहे. त्या विधेयकावर राष्ट्रपती यांची सही झालेली; परंतु प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेमुळे या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे. महायुतीचे सरकार आल्यास न्यायालयात प्रखरपणे बाजू मांडून बैलगाडा शर्यत निश्‍चितपणे पुन्हा सुरू करू. मी आजपर्यंत जाती पातीचे राजकारण कधीच केले नाही, केवळ माझ्यावर विरोधकांनी आरोप केले आहेत, हा आरोप खोटा असून तेच जाती-पातीचे राजकारण करत आहेत. पुणे -नाशिक महामार्ग आणि पुणे -नाशिक रेल्वे ही कामे पूर्णत्वास येत असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.