राज्यातील 38% कंपन्या सर्वाधिक प्रदूषक

प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे “रिपोर्ट कार्ड’ जाहीर

प्रदूषकांच्या नोंदणीसाठी यंत्रणा बसविणे बंधनकारक

पुणे – राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नुकतेच राज्यातील औद्योगिक प्रदूषणाबाबतचे “रिपोर्ट कार्ड’ जाहीर करण्यात आले आहे. यानुसार राज्यातील 45.1 टक्के कंपन्या या “थ्री स्टार’ म्हणजेच कमी प्रदूषक असून, सुमारे 38.3 टक्के कंपन्या या सर्वाधिक प्रदूषक (एक स्टार) असल्याचे सांगण्यात आले आहे. एकूणच कमी प्रदूषित कंपन्यांची संख्या जास्त असली, तरी तुलनेने कमी परंतु अत्याधिक घातक कंपन्यांचे प्रमाणदेखील चिंताजनक आहे.

औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणासाठी “स्टार रेटिंग’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यांतर्गत औद्योगिक कंपन्यांना प्रदूषण मानांकन देण्यात येते. यामध्ये सर्वाधिक प्रदूषण करणाऱ्या कंपनीला “एक स्टार’ तर सर्वात कमी प्रदूषक असलेल्या कंपनीला “पाच स्टार’ असे मानांकन दिले जाते. मंडळाकडे सध्या राज्यातील 253 कंपन्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 156 कंपन्यांना तीन किंवा त्यापेक्षा जास्तीचे मानांकन मिळाले आहे, तर 97 कंपन्यांना तीनपेक्षा कमी मानांकन मिळाले आहे. या कंपन्यांमध्ये सिमेंट, केमिकल, मेटल वर्क, पेपर, फार्मास्युटिकल, कापड, साखर आणि वीज या क्षेत्रांमधील कंपन्यांचा समावेश होतो.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार या कंपन्या या सर्वाधिक प्रदूषक कंपन्या गणल्या जातात. त्यामुळेच मंडळाच्या निर्देशानुसार या कंपन्यांमध्ये कार्बन उत्सर्जनसारख्या प्रदूषकांच्या नोंदणीसाठी “रिअल टाइम मॉनिटरिंग’ (सीइइएमएस) यंत्रणा बसविणे बंधनकारक आहे. या यंत्रणेमुळे कंपन्यांमधील प्रदूषणाच्या तत्काळ नोंदी घेणे शक्‍य झाल्याने, त्यासंदर्भातील कंपन्यांवर त्वरित कारवाईदेखील करता येते.

“स्टार रेटिंग’मध्ये पुण्यातील 21 कंपन्यांचा समावेश 
प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्टार रेटिंग उपक्रमात पुण्यातील 21 कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये चार कंपन्यांना सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्यांचे (वन स्टार) मानांकन मिळाले आहे. तर पाच कंपन्यांना सर्वात कमी प्रदूषणकारी (पाच स्टार) कंपनीचे मानांकन मिळाले आहे. या कंपन्या मेटल वर्क, फार्मास्युटिकल, कापड, केमिकल या क्षेत्रांमधील आहेत.

औद्योगिक क्षेत्रातील वायू प्रदूषणाबाबत तत्काळ नोंदणी घेण्यासाठी “स्टार रेटिंग’ हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त ठरत आहे. यामुळे प्रदूषणाबाबत कोणत्या कंपन्यांची कामगिरी कशी आहे, याबाबत त्वरित माहिती मिळते. या माहितीच्या आधारे अशा कंपन्यांवर कारवाई करून प्रदूषण नियंत्रणाबाबत काम करणे अधिक सोपे झाले आहे.
– हर्षप्रसाद गंधे, प्रादेशिक अधिकारी, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)