विजेच्या दहा लाख युनिटची आणि 93 लाख रुपयांची बचत
मुंबई – राज्यातील शासकीय इमारतींमधील जुनी विद्युत उपकरणे बदलून ऊर्जा सक्षम उपकरणे बसविल्यामुळे राज्यातील 1269 शासकीय इमारती ऊर्जा कार्यक्षम करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 1 एप्रिल पर्यंत सुमारे दहा लाख युनिट विजेचा वापर कमी झाला असून विज बिलापोटीचे 92.68 लाख रुपयांची बचत झाली आहे.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राज्यातील शासकीय इमारतींमधील जुनी विद्युत उपकरणे बदलून ऊर्जा सक्षम उपकरणे बसविण्याचा “स्पर्श’ (सोलर पॉवर अँड रिनोव्हेटिव्ह सस्टेनेबल हब) हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “स्पर्श’ प्रकल्पांतर्गत नागपूरमधील राजभवन, विधानभवन, रवी भवन, आमदार निवास,हैद्राबाद हाऊस, पुण्यातील राजभवन, सेंट्रल बिल्डिंग, जिल्हा रुग्णालय, सोलापूरमधील शासकीय सर्वोपचार रुग्णालय, मुलुंड येथील विमा रुग्णालय, मुंबईतील बांधकाम भवन, जीटी हॉस्पिटल, ठाणे जिल्हाधिकारी कार्यलय, कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालय,मध्यवर्ती प्रशासकीय भवन आणि औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाचे खंडपीठ या इमारतीमध्य ऊर्जा कार्यक्षम पंखे, दिवे, वातानुकुलित यंत्रे बसविण्यात आली आहेत.
पहिल्या टप्प्यात शासकीय इमारतींमधील दोन लाख ट्यूबलाईट, 75हजार पंखे व 1600 वातानुकुलित यंत्रे बदलण्यात आली आहेत. नवीन ऊर्जा कार्यक्षम केल्यामुळे सुमारे 9.95 लाख युनिट्स विजेची बचत झाली असून वीज बिलातही सुमारे 92.68 लाख रुपयांची बचत झाली आहे. स्पर्श उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व शासकीय इमारतींच्या छतांवर व परिसरातील मोकळ्या जागेत सौर ऊर्जा निर्मितीची सयंत्रे बसविण्यात येणार असून त्यामार्फत राज्य शासनाच्या इमारतींमध्ये सौर विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा