राज्यातील टॉप 15 आरोग्य केंद्रांच्या यादीत समावेश

रामदास सांगळे
अणे-सरकारी दवाखान्यात अपुऱ्या वैद्यकीय सेवा, रुग्णांची हेळसांड असेच चित्र सर्वांच्या मनावर बिंबलेले आहे. त्यामुळे रुग्ण सरकारी दवाखान्याकडे पाठ फिरवताना दिसतात. मात्र, याला जुन्नर तालुक्‍यातील निमगावसावा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अपवाद आहे. येथे विविध अत्याधुनिक वैद्यकीय सेवा पुरविल्या जात असल्याने खासगी दवाखान्यापेक्षा या सरकारी दवाखान्याकडे परिसरातील रुग्णांचा ओघ वाढला आहे. नुकताच या रुग्णालयाला महाराष्ट्र राज्य शासनाच्या कायाकल्प योजने अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार मिळाला आहे. तसेच महाराष्ट्रातील टॉप 15 आरोग्य केंद्रांत या रुग्णालयाची निवड झाली आहे. त्यामुळे परिसरामध्ये या आरोग्य केंद्राचा आरोग्य सुविधा पुरविण्यात बोलबाला निर्माण झाला आहे.
परिसरातील शिरोली, मंगरूळ, पारगाव, औरंगपूर, साकोरी, कावळपिंप्री, रानमळा, झापवाडी, निमगावसावा, सुलतानपूर आदी गावांतील रुग्णांना या रुग्णालयाचा फायदा होत आहे. येथे दिवसाला दीडशे ते दोनशे ओपीडी होता. येथे डिलिव्हरी रूम, ऑपरेशन थिएटर, प्रयोगशाळा, डोळे तपासणी रूम, औषध रूम, पुरुष वार्ड, महिला वार्ड अशा वेग वेगवेगळ्या स्वतंत्र रूम आहेत.
सुविधांमध्ये इसीजी मशीन, डोळे तपासणी मशीन, ट्रॅक्‍सन मशीन, इन्फ्रारेड मशीन, उपलब्ध आहेत. तसेच किडनी व हृदयाची तपासणी केली जाते. मधुमेह, हायपर टेंशन, ब्लड प्रेशर तपासणी यांचे महिन्यातून एकदा कॅम्प ठेवला जातो. लहान मुलांसाठी ही महिन्यातून एकदा कॅम्प ठेवला जातो. गरोदर महिलांनसाठी महिन्यातील प्रत्येक बुधवारी कॅम्प ठेवला जातो.
या आरोग्य केंद्रात स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरता राष्ट्रीय कार्यक्रम राबवले जातात. हिवताप, टी.बी. नियंत्रण करणे तसेच सहा रोगांवर लसीकरण केले जाते. गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवली जाते. सध्या भारत सरकारने सर्व बाळंतपणे घरी न होता रुग्णालयात व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत. शाळेतील मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करणे. हगवणीसारख्या सांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व उपचार, संततीनियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया करणे, रोगांचे निदान, उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम राबवणे अशी आरोग्याच्या दृष्टीने समाज हिताची कामे येथे केली जातात.
डॉक्‍टर रुग्णाची तपासणी करून त्यांना दाखल ही करून घेतात. येथे दाखल केलेल्या रुग्णांना स्त्री व पुरुष असे वेग वेगळे वार्ड आहेत. आसपासच्या उपकेंद्रातील आरोग्य सेवकांच्या सल्ल्याने रुग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होतात. कधीकधी या प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात नेले जाते. वैद्यकीय सेवेबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांना पारिचारिकांच्या कामावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांना भेटणे आणि वैद्यकीय सेवा पुरवणे हीदेखील त्यांची कामे डॉ. अमरनाथ तांबडे अगदी चोख पार पाडतात.

 • या दवाखान्याला मिळालेले पुरस्कार
  1) राज्य शासनाच्या कायाकल्प योजनेअंतर्गत उत्कृष्ट काम करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र
  2) राज्य शासनाचा 2015-16 चा प्रथम महिला डॉ. आनंदीबाई जोशी गौरव उत्कृष्ट प्राथमिक आरोग्य केंद्र पुरस्कार
  3) महाराष्ट्रातील टॉप 15 रुग्णालयात निवड
  4) केंद्र शासनाच्या एनक्‍यूएएस पुरस्कारासाठी राज्यातून निवड
  5) एनएबीएच अक्रीडेटेड आरोग्य केंद्र
  6)2014-15 चा पंचायत समिती जुन्नर चा सर्वोत्कृष्ट आरोग्य केंद्र पुरस्कार
 • येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे सर्व एकजुटीने काम करतात. त्यामुळे या केंद्राला उत्कृष्ट काम करणारे आरोग्य केंद्र असा पुरस्कार मिळाला आहेत. या आधी आळे, सावरगाव या केंद्रांना कायाकल्प योजने अंतर्गत पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जुन्नर तालुक्‍यातील मढ, आपटाळे, राजुरी या प्राथमिक आरोग्य केंद्रांना ही कायाकल्प योजने अंतर्गत पुरस्कार मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. तालुक्‍यातील सर्वच आरोग्य केंद्रांचा दर्जा वाढीसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
 • डॉ. उमेश गोडे, तालुका आरोग्य अधिकारी, जुन्नर
 • बेल्हे -राजुरी जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेत वाढ होण्यासाठी सन 2017-18 साठी 2 कोटी 58 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. निमगावसावा आरोग्य केंद्राच्या धर्तीवर ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्य सुविधेत कोणतीही कमतरता भासू देणार नाही. गुंजाळवाडी, रानमळा, कावळपिंप्री येथील जनतेसाठी नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  – पांडुरंग पवार, जिल्हा परिषद सदस्य
  या यशात माझ्या बरोबर माझ्या आधी असणारे वैद्यकीय अधिकारी यांचाही मोठा वाटा आहे. येथील कर्मचाऱ्यांनी या आधीही चांगल्या सुविधा दिल्या आहेत. तसेच आमचे वरिष्ठ ही सतत आम्हाला मार्गदर्शन करतात. आवश्‍यक सुविधा वेळोवेळी पुरवल्या जातात. या पुढेही मी व येथील कर्मचारी असेच काम करून रुग्णांना अधिक चांगली सेवा देऊ.
  – डॉ. अमरनाथ तांबडे, वैद्यकीय अधिकारी, निमगावसावा
 • परिसरातील खासगी दवाखान्यापेक्षा येथे चांगले व वेळेत उपचार होतात. त्यामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्‍यातील सर्व आरोग्य केंद्राने अशा सुविधा दिल्यास नक्‍कीच शासकीय दवाखान्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल.
  – अशोक डुकरे, नागरिक

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)