राज्यभरात वळिवाचीही पाठ; टंचाई भरमसाठ

पूर्वमोसमी पाऊस झालाच नसल्याने उष्मा वाढला

पुणे – उन्हाचा चटका कमी करण्यासाठी आणि पाणी टंचाईची झळ थोडी कमी करण्यासाठी आवश्‍यक असणाऱ्या पूर्वमोसमी पावसाच्या सरी यंदा झालेल्याच नाहीत. मिळालेल्या 1 मार्च ते 24 मे या कालावधीत सरासरी 6.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे उष्णतेत प्रचंड वाढ झाली आहे.

उन्हाळ्याच्या काळात शक्‍यता एकदा तरी पूर्वमोसमी पावसाची हजेरी होते. त्यामुळे थोडा दिलासा मिळतो. हा पाऊस शक्‍यतो मेदरम्यान एक ते दोन वेळा तरी पडतो. नगर, पालघरमध्ये वळवाच्या सरी पडल्याच नाहीत. तर सोलापूर, उस्मानाबाद, परभणी, भंडारा, गोंदियावगळता उर्वरित सर्वच जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने तीव्र ओढ दिली आहे. सध्या राज्यातील तब्बल 4 हजार सहाशे 15 गावे आणि सुमारे 10 हजार वाड्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. पूर्वमोसमीच्या सरींनीही पाठ फिरविल्याने टंचाईची तीव्रता वाढतच असल्याचे चित्र आहे.

पूर्वमोसमी हंगाम संपण्यास शेवटचे काही दिवस शिल्लक आहे. 24 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्याच्या दक्षिण भागात असलेल्या कोल्हापूर, सोलापूर, सांगली, लातूर, उस्मानाबाद, परभणी आणि पूर्व भागातील भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांतच काही प्रमाणात पूर्वमोसमी पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. गोंदियात सर्वाधिक 24.7 मिमी पाऊस पडल्याचे दिसून आले आहे. तर नगर, पालघर जिल्हे, मुंबई शहर, उपनगरांत एक टक्काही पाऊस झालेला नाही. तसेच ठाणे, हिंगोली, धुळे, नंदूरबार येथील पावसाची आकडेवारी उपलब्ध होऊ शकली नाही. तर दहा जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 10 टक्केही पाऊस पडलेला नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

देशातही सरासरीपेक्षा कमी पाऊस
1 मार्च ते 31 मे या कालावधीत पूर्वमोसमी पावसाचा हंगाम असतो. या काळात देशात सरासरी 115 मिलिमीटर पाऊस पडतो. आतापर्यंत देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 88.9 मिलिमीटर पाऊस पडला आहे. यातही राजस्थान, मध्य प्रदेश, झारखंड, पश्‍चिम बंगालमध्ये सरासरीपेक्षा अधिक, पंजाब, हरियाणा, बिहार, सिक्कीम, आसाम, मेघालय, त्रिपुरा, ओडिशा राज्यांत सरासरीइतका, तर उर्वरित सर्वच राज्यांत सरासरीपेक्षा अपुरा पाऊस पडला आहे. यातही महाराष्ट्र, गुजरात मिझोराम, तमिळनाडूमध्ये पूर्वमोसमी पावसाचे प्रमाण अत्यल्प असल्याचे दिसून आले आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×