राजेंद्र हेंद्रे यांना उत्कृष्ट शरिरसौष्ठव संघटक पुरस्कार

सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – विविध क्रीडा प्रकारात साताऱ्यातील खेळाडू सातत्याने चमकत आहेत. क्रीडा स्पर्धा आणि खेळाडूंची वाढती संख्या यामुळे साताऱ्याचे नाव आता खेळाडूंचा जिल्हा असे झाले आहे. बॉडी बिल्डिंग अर्थात शरिरसौष्ठव या क्रीडा प्रकारातही साताऱ्याचे नाव झळकत असून जिल्हा संघटनेचे सचिव राजेंद्र हेंद्रे यांचे यामध्ये मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन आ.शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा जिल्हा शरिरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र हेंद्रे यांना टिटवाळा (मुंबई) येथे झालेल्या राज्य शरिरसौष्ठव स्पर्धेवेळी महाराष्ट्र राज्य बॉडी बिल्डिंग संघटनेतर्फे देण्यात येणारा मानाचा उत्कृष्ट शरिरसौष्ठव संघटक हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते हेंद्रे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी मधुकर तळवलकर, डॉ. बाबा साठे, ऍड. नितीन माने, अमित कासट, नाना इंदलकर, नितीन प्रभाळे, सौ. दिया बगाडे, डॉ. अजय साठे, फैय्याज शेख, ऍड. शार्दुल शेटे, आशियाई विजेता रवी पुजारी, सुधीर भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
राजेंद्र हेंद्रे हे गेली 48 वर्ष सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी 1972 साली लिओ क्‍लबच्या माध्यमातून सुरु केलेले काम आजअखेर चालू आहे. त्यांच्यामुळे नवोदित खेळाडूंना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत असून त्यांच्या माध्यमातून यापुढेही शरिरसौष्ठव क्रीडा क्षेत्राची आणि खेळाडूंची प्रगती होईल, असा विश्‍वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी व्यक्‍त केला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.