राजेंद्र जगताप पुन्हा महापालिकेत !

स्मार्ट सिटीचे कार्यालय महापालिकेत स्थलांतरित होणार

पुणे :  स्मार्ट सिटी प्रकल्प हा महापालिकेचाच प्रकल्प आहे. त्यामुळे कामकाजात प्रशासकीय समन्वयासाठी स्मार्ट सिटीचे सेनापटी बापट रस्त्यावरील कार्यालय येत्या महिनाभरात महापालिका मुख्य इमारतीमध्ये स्थलांतरीत केले जाणार आहे. त्यासाठी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी तत्वत: मान्यता दिलेली आहे.
महापालिका मुख्य इमारतीचे पक्षनेते आणि महापौर कार्यालय नवीन विस्तारीत इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मजला स्मार्ट सिटीसाठी दिला जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले आहे. स्मार्ट सिटीचे प्रलंबित प्रश्‍न तसेच इतर विषयांबाबत बुधवारी स्मार्ट सिटी आणि महापालिका यांच्यात बैठक झाली. यात हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्मार्ट सिटी योजनेत महापालिकेने देशात दुसरा क्रमांक मिळविला. 2016 पासून हे काम सुरू आहे. त्यासाठी केंद्र, राज्यशासन आणि महापालिकेची संयुक्त अशी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसडीसीएल) ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. यात क्षेत्र विकासासाठी बाणेर-बालेवाडी आणि औंधची निवड करण्यात आली. त्यामुळे येथील सर्व प्रकल्प महापालिकेच्या मान्यतेनेच होणार आहेत. असे असले, तरी या कंपनीसाठी तत्कालिन आयुक्त कुणाल कुमार यांनी या कंपनीचे कार्यालय सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॉवरमध्ये दिले. मात्र, ही जागा अतिशय कमी असून येथे कंपनीचे सुमारे 100 कर्मचारी काम करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्यामुळे मोठ्या जागेची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, बुधवारी झालेल्या बैठकीत स्मार्ट सिटी आणि महापालिका हे दोन्ही घटक शहर विकासाचे काम करत आहेत. त्यामुळे या दोन्हींमध्ये समन्वय असावा, यासाठी या दोन्ही संस्थांची कार्यालये एकाच इमारतीत असावी, यावर चर्चा झाली. त्यावेळी नवीन विस्तारीत इमारत बांधल्याने येथील नगरसचिव कार्यालय तसेच सर्व पक्षनेत्यांची कार्यालये पुढील काही दिवसांत स्थलांतरित केली जाणार आहेत. त्यामुळे जुन्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जागा रिकामी होणार असून ती स्मार्ट सिटीसाठी देणे शक्‍य असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. या बैठकीस स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांच्यासह, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले आणि वेगवेगळे विभाग प्रमुख उपस्थित होते.

कमांड आणि कंट्रोल सेंटरही हलविणार?
स्मार्ट सिटीसाठी सिंहगड रस्त्यावरील पु.ल. देशपांडे उद्यानाच्या समोर कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, या सेंटर वरूनही वाद सुरू आहेत. त्यामुळे हे सेंटरही महापालिकेत असावे का, याबाबत चर्चा झाली. यावेळी नवीन विस्तारीत इमारतीमध्ये नवीन सभागृह उभारल्याने जुन्या इमारतीच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभाग़ृहात हे सेंटर उभारता येईल का, याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, प्रशासनाने त्यास नकार दिला. याबाबत मुख्यसभेत निर्णय घ्यावा लागणार असल्याने सभागृहाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्‍वासन राव यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)