राजशिष्टाचार पाळला गेला, तरच आघाडी

आमदार संग्राम थोपटे : खासदार सुळेंचे नाव न घेता टीका

भोर- लोकसभेला आघाडीचा धर्म यांना आठवतो आणि विधानसभेला हा धर्म कसा विसरला जातो? लोकसभेला दोन पंचवार्षिकमध्ये आम्ही आघाडी धर्म पाळला असताना 2014च्या विधानसभेला यांना याचा विसर पडला. यंदाही तुमची जर तशीच तयारी असेल तर आमाचीही माघार नाही. यापुढे कार्यकर्त्यांना विश्‍वास घेऊन आणि कोणत्याही कार्यक्रमात राजशिष्टाचार पाळला गेला तरच भोरमध्ये राष्ट्रवादीबरोबर आघाडीचा विचार केला जाईल, असा इशारा आमदार संग्रम थोपटे यांनी केला आहे.
भोंगवली गटातील इंगवली, केंजळ, काळेवाडी, किकवी, मोरवाडी, पाचलिंगे आदि गावात सुमारे 4 कोटी 50 लाख रुपये खर्चाच्या कामांचे उद्‌घाटन, भूमिपूजन आमदार थोपटे यांचे हस्ते करण्यात आले, त्यावेळी मोरेवाडी येथील सभेत ते बोलत होते. याप्रसंगी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, जिल्हा उपाध्यक्ष काशिनाथ धाडवे-पाटील, दिलीप बाठे, राजगडचे संचालक व ठेकेदार के. डी. सोनवणे, नाना सुके, शंकर धाडवे, सोमनाथ वचकल, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मदन खुटवड, सरपंच स्वाती मोरे, सुभाष मोरे, माऊली पांगारे, संजय थीटे, नितीन बांदल, शरद दातीर, ग्रामसेवक संदीप धोत्रे, सार्वजनिक बांधकामचे आर. एल. ठाणगे, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे आभियंता करंजीकर, अभियंता हल्याळे, शेख यांच्यासह भोंगवली गटातील विविध गावचे सरपंच, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, तालुक्‍यात विकासकामांच्या खोट्या बातम्या पसरवण्याचा सारिपाट सुरू आहे. आम्ही मंजूर केलेली कामे मीच केली असा विरोधाभास विरोधक पसरवण्याचे काम जिल्हा परिषदेचा एक पुढारी करीत आहे. भोंगवली-माहूर या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधीचा निधी लोकप्रतीधी म्हणून मंजूर केला असताना हे काम मीच केले असे कोणी म्हणत असेल तर त्याची जागा कार्यकर्त्यांनी त्याला दाखवली पाहिजे. राजशिष्टाचार तुमच्याकडे नसेल तर त्याची अपेक्षा आमच्याकडूनही करु नका, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता त्यांनी दिला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी सरपंच मारुती मोरे, तर सुभाष मोरे यांनी आभार मानले.

  • राजकारणाच्या शेकोटीची ऊब घेण्याचे थांबवा
    भोर तालुक्‍यातील वीज, पाणी, राष्ट्रीय महामार्गाचे प्रश्‍न सोडवण्याचे काम होत असताना सारोळा येथील पुलाची रुंदी अडीत मीटरची पाच मीटर करुन घेतली. मात्र, राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना यांचा अध्यक्ष म्हणतो हे काम आमदारांचेच. राजकारणाच्या शेकोटीची ऊब घेण्याचे काम यांनी थांबवावे. वरवे, धांगवडी, सारोळा उड्डाण पुलाच्या कामावरुन हे आमच्या नावाने ओरडतात. महामार्गावर मुंगी मेली तरी त्याला आमदारच जबाबदार! मग श्रेयवाद कशाला करता, श्रेयवादाचे नारळ कशाला फोडता असा सवाल करुन विरोधकांची यावेळी आमदार थोपटेंनी खिल्ली उडवली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)