राजमाची : पर्यटकांचा स्वर्ग!

  • फिरस्ता : लोणावळ्यात निसर्गाची मुक्‍तहस्ताने उधळण केलेला परिसर

लोणावळा – पुणे आणि मुंबई या दोन महानगरांच्या बरोबर मध्यभागी बसलेले व पर्यटनस्थळ म्हणून परिचित असलेल्या लोणावळा शहरामध्ये सध्या रोज पर्यटकांचा मेळा भरतो. भुशी डॅम, लायन्स पॉईंट, ड्युक्‍स नोझ, अमृतांजन पॉईंट, शूटिंग पॉईंट, लोहगड, पवना व राजमाची पॉईंट या ठिकाणी पर्यटक अलोट गर्दी करताना दिसतात. पैकी राजमाची पॉईंटवरून दूरवर दिसणारा राजमाची हा डोंगरी किल्ला गेली कित्येक वर्ष पर्यटकांना खुणावत आहे. मिनी कोकणकडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजमाची या पर्यटनस्थळावर एक नजर…

सह्याद्रीच्या लोणावळा-खंडाळा येथील पर्यटन स्थळापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे निर्माण झालेला परिसर “उल्हास नदीचे खोरे’ म्हणून ओळखला जातो. याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते. या “उल्हास नदी’च्या खोऱ्यांच्या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस 16 किमी अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे. किल्ल्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास आपल्या राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर तर एका बाजूस पेठ, भीमाशंकर, ढाकचा किल्ला, गोरखगड, सिद्धगड, चंदेरी असा परिसर नजरेत पडतो. किल्ल्याच्या पायथ्याला उढेवाडी नावाचे गाव पूर्वीपासून बसलेले असून, येथे फक्‍त महादेव कोळी समाजाची वस्ती आहे. सुमारे 21 ते 22 घरांच्या या गावामध्ये 150 ते 200 लोक वस्तीकरून आहेत. मुख्य शहरापासून दूर रानावनात एकाकीपणे बसलेल्या या गावामध्ये कोणत्याही स्वरूपाचे रोजगार नसल्याने यातील बरेच लोक लोणावळ्यामध्ये येऊन येथील काही बंगल्यामधून माळीकाम वगैरे करताना आढळतात. मात्र गणेशोत्सवाच्या काळात हे सर्व लोक गावामध्ये एकत्र येऊन पाच ते सहा दिवस उत्सव साजरा करतात.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नयनरम्य श्रीवर्धन…
राजमाची किल्ल्याला दोन स्वतंत्र बालेकिल्ले आहेत. यातील पहिला श्रीवर्धन हा राजमाचीच्या दोन बालेकिल्ल्यांपैकी सर्वांत उंच असा बालेकिल्ला. श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरूज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. किल्ल्याला अनेक ठिकाणी दुहेरी तटबंदी असावी, असे अवशेषांवरून दिसते. दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे. दरवाजाच्याच बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. किल्ल्यावर जाण्याच्या वाटेवरच एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत. या गुहा म्हणजे पूर्वी दारूगोळ्याचे कोठार होते. बालेकिल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे. समोरच ढाकबहिरीचा चित्तथरारक सुळका तर त्याच्या उजव्या हातास असणारा शिरोत्याचा नयनरम्य तलाव हा सर्व परिसर दिसतो. उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या मनरंजन या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट तुलनेने सोपी आहे. या किल्ल्याचा दरवाजा हा गोमुखी आहे. किल्ल्यावर गेल्यावर उजवीकडच्या वाटेवर जुन्या काळातील किल्लेदारांच्या वाड्यांचे अवशेष दिसतात. त्यासमोरच छप्पर उडालेले उत्तम दगडी बांधकामाचे मंदिर आहे. या मंदिराच्या दरवाजावर गणेशाचे शिल्प कोरलेले आहे. दोन चार पाण्याची टाकी आहेत. किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे. येथून कर्नाळा, प्रबळगड, ईर्शाळगड, ढाकबहिरी, नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो.

एकवीस हंडे मावेल एवढा दगडी पाळणा…
राजमाची किल्ल्याच्या पोटात एक लेणी आहे यालाच “कोंढाणे लेणी’ असे म्हणतात. ही लेणी कोंडाणा गावापासून आग्नेयेस दोन किमी अंतरावर आहेत. ही लेणी ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकात म्हणजे सातवाहन कालाच्या सुरवातीला खोदलेली आहे. अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे. या लेणी समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे. या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर असणाऱ्या सत्तेखाली झाली. यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण 2500 वर्षांपूर्वीचा असावा. याच्या पुढेच उल्हास नदीच्या पात्रात कोंडिवडे आणि कोंडाणाजवळ एका मोठ्या दगडात 21 हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून, त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे. पूर्वी स्थानिक लोक मुलं होण्यासाठी येथे नवस करत असा संदर्भ महाराष्ट्र गॅझेटिअर रायगड जिल्हा सन 1993 पृष्ठ क्र. 721 वर दिला आहे. या परिसरात याला “जिजाऊ कुंड’ म्हणतात या कुंडात लोक मोठ्या श्रद्धेने सूर्यस्नान करतात.

सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर…
लोणावळ्याहून तुंगार्लीमार्गे राजमाचीला येताना वाटेतच गावाच्या वेशीजवळ एक योद्‌ध्याचे स्मारक, अर्धवट तुटलेली तटबंदी, दरवाजाचे अवशेष, गणपती आणि मारुतीरायाची मूर्ती आहे. किल्ल्यावरून आजुबाजूचा दिसणारा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. किल्ल्याच्या माचीवर वस्ती आहे, तिला “उधेवाडी’ असे म्हणतात. या वस्तीच्या जवळच उदयसागर तलाव आहे. पावसाळ्यात हा तलाव ओसंडून वाहतो. नुकतेच गावकऱ्यांनी या तलावाला तारेचे कंपाउंड घालून यातील पाणी पंपाच्या साहाय्याने वर गावामध्ये आणले आहे. उदयसागर तलावाच्या पश्‍चिमेला एक सुंदर कळशीदार शंकराचे मंदिर आहे. या मंदिरासमोरच गोमुख असून, त्यातले पाणी समोरच्या टाक्‍यामध्ये पडते.

धबधब्यांच्या सुंदर दृश्‍याची मोहिनी
राजमाचीला पूर्व आणि दक्षिण दिशांना जी खोल दरी आहे ती “कातळदरा’ या नावाने ओळखली जाते. या दरीतूनच उल्हास नदी उगम पावते. या नदीच्या पश्‍चिमेकडील डोंगराला “भैरव डोंगर’ म्हणतात. अशा निसर्गसौंदर्याने नटलेल्या राजमाची किल्ल्याचे खरे वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याचे दोन बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत खडकात खोदलेल्या गुहा लागतात. श्रीवर्धन आणि मनरंजन बालेकिल्ल्यांमध्ये एक सखलपट्टी आहे, यावरच भैरवनाथाचे एक मंदिर आहे. मंदिरासमोरच तीन दीपमाळा आणि लक्ष्मीची मूर्ती आहे. येथून डावीकडे जाणारी वाट मनरंजन आणि उजवीकडची वाट श्रीवर्धन किल्ल्यावर जाणारी आहे. उदयसागर तलावाच्या समोरील टेकाडी खाली उतरून गेल्यावर समोरच एक मोठे पठार लागते. पावसाळ्यात दरीतून पडणाऱ्या धबधब्यांचे सुंदर दृश्‍य दिसते.

हिरवीगार वनश्री अगणित धबधबे आणि सतत कोसळणारा पाऊस अशा आल्हाददायक वातावरणामुळे प्रत्येक गिरीप्रेमी मनोमनी कुसुमाग्रजांच्या ओळी गुणगुणायला लागतो, “पलीकडे खळाळे निर्मळ निळसर पाणी, उत्तुंग तरुंची उभी सभोती श्रेणी, एकाकी धूसर पाऊलवाट मध्ये ही, तिजवरून विहारे मनामध्ये वनराणी. “उधेवाडी गावात घरगुती राहण्याची उत्तम सोय होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)