राजगुरूनगरवासियांची तहान भागणार

चासकमान धरणातून डावा-उजव्या कालव्यासह भीमानदीत आज पाणी सोडणार

दोन दिवसांत केदारेश्‍वर बंधारा भरणार

राजगुरूनगर- राजगुरूनगरसह परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी चासकमान धरणातून भीमा नदी व डावा-उजव्या कालव्यात पाणी सोडण्याचा आदेश जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी रविववारी ( दि.20) काढला असून सोमवारी (दि. 22) धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे. हे पाणी बंधाऱ्यात पोहचण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार असल्याने उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी दिली.

राजगुरुनगर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केदारेश्‍वर बंधारा आटला आहे. बंधाऱ्यात पाणीसाठा नसल्याने शहरातील नागरिकांना पाणी मिळण्यासाठी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची भेट घेवून चासकमान धरणातून राजगुरूनगर शहरासाठी पाणी भीमा नदीत सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेवून मार्ग काढला आहे. परिसरातील सातकरस्थळ, तिन्हेवाडी, मांजरेवाडी टाकळकरवाडी, निमगाव, शिरोली, खरपुडी, दोंदे, वाकी बुद्रुक चांडोली, वडगाव, कडूस आदि गावे व वाड्यावस्त्यांमधील विहिरीतील पाणीसाठे आटले आहे. त्यांनी जिल्हाधिकारी व चासकमान धरण अभियंता यांच्याकडे पाणी सोडण्याबाबत मागणी केली होती. वरील गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद झाल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. राजगुरूनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्‍वर बंधारा आटल्याने भीमा नदी पात्रात चासकमन धरणातून पाणी सोडण्याची वारंवार मागणी केल्याने जिल्हाधिकारी यांनी धरणातून उपलब्ध पाण्याचे नियोजन करून पाणी सोडण्यात येणार आहे.

  • शेतीपंपाचा विद्युतपुरवठा खंडीत करणार
    चासकमान धरणाच्या डावा व उजव्या कालव्यातून आणि भीमानदीपात्रात सोमवारी (दि. 22) पाणी सोडण्यात येणार आहे. चासकमान धरणात अत्यंत कमी पाणीसाठा शिल्लक आहे त्यातून हे पाणी सोडण्यात येणार आहे. कालव्याबरोबरच भीमानदीमध्ये पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे भीमानदी व डावा-उजव्या कालव्यावर असलेल्या शेतकऱ्यांचे शेती पंप बंद ठेवण्यात येणार असून त्याचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोडण्यात येणारे पाणी फक्‍त पिण्यासाठी वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारी पाणी सोडण्यात येणार असून दोंदे बंधाऱ्याचे ढापे काढण्यात येणार आहे.तर अनधिकृत उपसा थांबविण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करून अवैध पाणी उपसा होवू नये यासाठी भरारी पथके तयार करून त्यामाध्यमातून कारवाई केली जाणार आहे.
  • स्त्रोत अटल्याने टॅंकरमध्ये भरणार कोठून?
    खेड तालुक्‍यात 24 गावातील वाड्यावस्त्यांना पाच टॅंकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मात्र, पाण्याचे स्त्रोत आटल्याने टॅंकरमध्ये पाणी भरणाऱ्या विहिरींचे साठे आटल्याने पाणी भरायचे कोठून हा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र डावा आणि उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येणार असल्याने कालव्याला पाणी आल्यास विहिरीतील पाणीपातळी वाढून पाणीपुरवठा पुन्हा सुरुळीत होण्यास मदत होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.