राजगुरुनगरात “मेगाब्लॉक’ नित्याचाच

राजगुरूनगर- राजगुरुनगर-वाडा रस्त्यावर सकाळी आणि दुपारी मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत असून त्याचा त्रास विद्यार्थ्यांसह पादचारी नागरिकांना होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस आणि नगरपरिषद प्रशासनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांचे मात्र, हाल होत आहेत.
राजगुरुनगर शहरात वाडा रस्त्यावर अलीकडच्या काळात मोठ्याप्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. अगोदरच शहरातील अरुंद रस्ता आणि त्यात कंपनी आणि शाळेच्या बसची तसेच इतरत्र जड अवजड वाहनाची मोठ्या संख्येने वाहतूक असते. सकाळी आठ आणि दुपारी दोन ते तीन याकाळात या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावर महात्मा गांधी विद्यालयासमोर फुटपाथ तयार करण्यात आला आहे. त्यामुळे पथारीधारकांनी थेट रस्त्यावरच दुकाने थाटली आहेत. यामुळे मोठ्या वाहनांना रस्त्याने जाताना दुसऱ्या वाहनाला पास करता येत नसल्याने ही वाहतूक कोंडी होत आहे.
शहरात सुरळीत वाहतूक राहावी, कोंडी होवू नये यासाठी सहायक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सहा महिन्यांपूर्वी रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली होती. तर पुणे-नाशिक महामार्गापासून राजगुरुनगर-वाडा रस्ता मोकळा केला होता. त्यानंतर काही दिवसांत रोटरी क्‍लब आणि महात्मा गांधी शाळेने एकत्रित या ठिकाणी सुमारे पाच फुटाचा फुटपाथ टाकला. त्यानंतर त्यापुढे दोन फुट हुतात्मा राजगुरू यांच्या जीवनपट उभा करण्यासाठी फलक आणि आता त्यापुढे अनेक पथारीधारकांनी त्यांची दुकाने रस्त्यात मांडल्याने बेसुमार वाहतूक कोंडी होत आहे.
चाकण येथे एमआयडीसी येथे जाणाऱ्या कामगारांची संख्या राजगुरुनगर शहरात मोठी आहे. त्यांची ने-आण करणाऱ्या वाहनांची संख्या जवळपास दोनशेच्या पुढे आहे. ही सर्व वाहने राजगुरुनगर शहरातून जा-ये करीत असतात. त्यांच्या जाण्याची वेळ सकाळी सात व दुपारी अडीच वाजता असते याच वेळेत राजगुरुनगर शहरातील शाळा भरतात आणि सुटतात मुलांना घरी नेण्यासाठी शाळेत सोडण्यासाठी पालकांच्या गाड्या रस्त्यावर असतात, यामुळे या वेळेत मोठी कोंडी होते. शिवाय भीमाशंकर येथे जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असल्याने हा रस्ता वाहतूककोंडीला पूरक बनला असून याचा फटका केवळ सर्वसामन्य जनतेलाच बसत असून त्यांनी प्रशासानाच्या कारभारावर नाराजी व्यक्‍त केली आहे.

  • पुनर्वसनाच्या हमीला वाटण्याच्या अक्षदा
    राजगुरूनगरातील वाडा रस्त्यावर अनेक वाहने, टपऱ्या रस्त्यालगत उभी असतात. प्रशासानांकडून केवळ तोकडी कारवाई केली जाते. काही आमिषे दाखवून त्यांना उठवण्यात येते पुढे मात्र पुनर्वसनाचे गाजर दाखवले जाते. शहरातील सुमारे 40 पथारीधारकांना मध्यंतरी केलेल्या कारवाईमुळे उघड्यावर आले त्यांच्या पुनर्वसनाची हमी देणारी नगरपरिषद, प्रांताधिकारी आयुष प्रसाद यांनी वाटण्याच्या अक्षदा दाखविल्याने ही मंडळी आता मिळेत तिथे रस्त्यावर दुकाने थाटून बसली आहेत. याकडे कोणाचे लक्ष नसल्याने शहरातील वाहतुकीची समस्या आणखीनच बिकट झाली आहे. शासनाच्या वतीने वेळकाढूपणा केला जात असल्याने आणि शहरातील मोठे दुकानदार त्यांच्या ग्राहकांना पार्किंग नसल्याने ते दुकानासमोर उभी करीत असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)