राजकीय उदासीनतेमुळे संगमनेर-भुतोंडे रस्त्याची दुर्दशा

स्थानिक नागरिकांनी केली दुरुस्तीची मागणी : पर्यटनावर परिणाम

जोगवडी- भोर तालुक्‍यातील भाटघर धरणाच्या उत्तर बाजूस संगमनेर ते भुतोंडे रस्ता 33 किमी अंतराचा आहे. या रस्त्यावर अनेक ठिकाणी तीव्र वळणे असून सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

भोर-कापूरहोळ मार्गावर संगमनेर थांबा आहे. संगमनेर थांब्यापासून पश्चिम दिशेला 2 ते 3 किलोमीटर अंतरावर भाटघर धरणाचे उत्तरेकडील गेट आहे. या ठिकाणी यू आकाराचे तीव्र वळण आहे. या वळणावर वळण घेण्यासाठी एसटी व ट्रक या वाहनांना कसरत करावी लागत आहे. यामुळे या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. या ठिकाणी दरीचे स्वरूप असल्याने अपघात होण्याची शक्‍यता असून आतापर्यत कित्येकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वळण घेतल्यानंतर अरुंद रस्ता आहे. एका बाजूला धरणाच्या बागेची भिंत आहे तर दुसऱ्या बाजूला दुसरी छोटीशी दरी आहे. या ठिकाणी दोन वाहने बसत नसल्याने हॉर्न दिल्यानंतर दुसऱ्या वाहनास थांबावे लागत आहे. दरीचे स्वरुप असणाऱ्या बाजूस संरक्षक कठडे नाहीत. या ठिकाणी आजपर्यंत अनेक अपघात झाले आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सदरचा रस्ता वळवळणाचा आहे. अनेक तीव्र वळणे असून रस्त्याच्या कडेने झुडपे असल्याने अपघात होत आहेत. अपघात क्षेत्राच्या ठिकाणी दिशादर्शक फलक नाही. नवीन वाहन चालकांना रस्त्याचा अंदाज न आल्याने अपघात होत आहेत. या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. सतत खड्ड्यात वाहने आदळल्याने वाहनांचे नुकसान होत आहे तर प्रवाशांना व वाहन चालकांना मनक्‍याचे विकार होत आहेत. रस्त्यावर काही ठिकाणी एका बाजूला उंचवटा तर दुसऱ्या बाजूला खोलगट असल्याने वाहन पलटी होण्याची शक्‍यता आहे. वर्षानुवर्षे या समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने स्थानिक नागरिकांना फक्त संताप व्यक्त करावा लागत आहे.

सदर रस्त्यावरन ये-जा करणारे नागरिक धरणग्रस्त आहेत. या नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने पर्यटकही तालुक्‍यात येण्यास कानाडोळा करीत आहेत. रस्त्याची स्थिती सुसज्ज असल्यास पर्यटकांमध्ये ही भर पडणार आहे तर येथील स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल. या रस्त्यावरील भागात हर्णस व जोगवडी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या ठिकाणी रुग्णांना प्राथमिक उपचार केले जातात; परंतु अचानक कोणाला गंभीर आजार झाल्यास तातडीने रुग्णाला शहरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करावयाचे असल्यास रस्त्यावरील खड्डयामुळे वाहन वेगाने चालवता येत नाहीत. त्याचा परिणाम वेळेत रुग्णावर उपचार न झाल्याने रस्त्यातच रुग्णाला जीव गमवावा लागत आहे.

  • रस्त्याची गुणवत्ताहीन कामे
    दरवर्षी या रस्त्यावरील खड्डे पावसाळा हंगाम संपल्यानंतर भरले जातात. यावर्षी काही ठिकाणी खड्डे भरले असले तरी त्याची गुणवत्ता हलक्‍या प्रतीची असल्याने खड्डयाची स्थिती जैसे थी वैसी झाली आहे तर काही ठिकाणी खुड्डेच भरले नाहीत. सदर रस्ता अरुंद असल्याने दोन वाहने एकाच वेळी बसत नाहीत. यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे योग्य रुंदीचा नवीन रस्ता बनवण्याची मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.