West Bengal Election : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीची (West Bengal Election) मतमोजणी सोमवारी (४ मे) सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. संपूर्ण देशाचे लक्ष यावेळी निकालाकडे लागले असून, विशेषतः पश्चिम बंगालमधील अटीतटीच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने एका महत्त्वाच्या मतदारसंघात पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एकूण २९४ विधानसभा मतदारसंघांसाठी (West Bengal Election) दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. यंदा मतदारांनी अभूतपूर्व उत्साह दाखवत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले. छप्परफाड मतदान झाल्याचे चित्र सर्वत्र दिसले. West Bengal Election सत्ताधारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) आणि मुख्य विरोधक भाजप या दोन्ही पक्षांनी आपलेच सरकार स्थापन होईल, असा दावा केला आहे. बहुतेक एक्झिट पोल्समध्ये दोन्ही पक्षांमध्ये काँटे की टक्कर होण्याचे अंदाज व्यक्त करण्यात आले आहेत. मतदानादरम्यान राज्यातील अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. काही मतदान केंद्रांवर अनुचित प्रकार आणि गोंधळ झाल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यातील सर्वाधिक गंभीर प्रकार फाल्टा विधानसभा मतदारसंघात घडला. या मतदारसंघात (West Bengal Election) मतदानापूर्वीपासूनच प्रशासन आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने फाल्टा मतदारसंघातील सर्व २८५ मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, फाल्टा मतदारसंघात २१ मे रोजी पुन्हा मतदान होणार आहे. तर या मतदारसंघासह इतर ठिकाणच्या पुन्हा मतदान झालेल्या भागांची मतमोजणी २४ मे रोजी होईल. २९ एप्रिल रोजी झालेल्या मूळ मतदानादरम्यान अनेक केंद्रांवर मतदान प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अडथळे आणण्यात आल्याचे गंभीर आरोप समोर आले होते. त्यामुळे आयोगाने हा निर्णय घेतला. फाल्टा व्यतिरिक्त डायमंड हार्बर आणि मगराहाट पश्चिम या दोन विधानसभा मतदारसंघातील १५ मतदान केंद्रांवरही पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे या तीन मतदारसंघांच्या अंतिम निकालासाठी २४ मे पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. उर्वरित सर्व मतदारसंघांची मतमोजणी मात्र सोमवारीच पार पडेल. देशभरातील या विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे केवळ राजकीय वर्तुळाचेच नव्हे तर सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमधील निकाल हा आगामी राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम करणारा ठरण्याची शक्यता आहे.