राखीव वनक्षेत्रावरील झाडे पाण्याअभावी जळाली

ओझर- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गेल्या वर्षी जुन्नर तालुक्‍यातील वनजमिनीवर लोकशासन जनआंदोलकांनी केलेली अतिक्रमणे हटवून त्या ठिकाणी वनविभागाकडून जल व मृदू संधारणाची कामे त्वरित हाती घेण्यात आली होती. अतिक्रमण काढलेल्या जागेवर नवीन वृक्षलागवड करण्यात आली; परंतु वृक्षसवंर्धनाची जबाबदारी संबंधित विभागाकडून व्यवस्थित पार न पाडल्यामुळे जुन्नर तालुक्‍यातील कैलासनगर (हिवरे बुद्रुक) येथील राखीव वनक्षेत्र असलेल्या वनजमीनींवर लावलेली अनेक झाडे पाण्याअभावी जळून गेली असून, काही झाडे अखेरच्या घटका मोजत असल्याचं चित्र सध्या येथे दिसून येत आहे.
जुन्नर तालुक्‍यातील 22 हजार हेक्‍टर वनजमीनींवरील अतिक्रमणे महसूल विभाग, पोलीस प्रशासन, राज्य राखीव दल व वनविभाग यांच्या मार्फत गेल्या वर्षी 18 मे 2017 रोजी काढण्यात आली होती. येडगाव जलाशय आणि कुकडी नदीतून आणलेल्या खासगी जलवाहिन्या (पाइपलाइन) वनविभागाच्या विनापरवानगी या जागेतून गेल्या होत्या, त्या काढून टाकण्यात आल्या होत्या, पाइप आणि ठिबक सिंचन जप्त करण्यात आले होते. त्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये याकरिता या जागेवर हजारो नवीन वृक्ष लावण्यात आले होते. कैलासनगर येथील गट क्र. 45 मध्ये देखील अतिक्रमण काढून त्या ठिकाणी वड, लिंब, चिंच, जांभूळ आदी प्रकारची 153 झाडे लावण्यात आली होती. त्यावेळी प्रांताधिकारी कल्याण पांढरे, तहसीलदार महेश पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आणि पोलीस उपविभागीय अधिकारी जयश्री देसाई, उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली होती. वृक्षारोपण झाल्यावर त्या झाडांना पाऊस पडेपर्यंत नियमित पाणी देण्यात आले होते; परंतु वनविभागाच्या ढिसाळ आणि सुमार नियोजनामुळे गेल्या तीन-चार महिन्यांपासून या झाडांना पाणी न दिल्यामुळे ही झाडे जळून गेली आहेत, तर काही झाडे अखेरच्या घटका मोजत आहेत. विनापरवानगी वनविभागाच्या जागेतून गेलेल्या खासगी जलवाहिन्या (पाईपलाइन) पूर्ववत चालू आहेत, त्या चालू करण्यास आर्थिक तडजोड झाल्याचे येथील ग्रामस्थांनी नाव न छापण्याचा अटीवर सांगितले.

 • उपाय योजना करणे गरजेचे
  जागतिक तापमानात झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता वृक्षलागवड, त्यांचे संगोपन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारही पुढाकार घेत आहे दरवर्षी नव्याने वृक्षलागवड करीत आहे; परंतु वृक्षलागवाडीचे उद्दिष्ट फक्त कागदोपत्री पूर्ण करण्यावर भर दिला जातो. परिणामी वृक्षसवंर्धनाची, अंमलबजावणी जबाबदारीने होत नसल्याने झाडे जळण्याचे प्रमाण वाढले आहे. वृक्षांची खुंटणारी वाढ वाढवणे, मृत झाडांच्या जागी पुनर्लागवड करणे, पाण्याचे योग्य नियोजन आणि झाडांची देखभाल करणे गरजेचे आहे.
 • रोपवाटिका गायब
  अतिक्रमण काढल्यावर येथे नव्याने अतिक्रमण होऊ नये, तसेच नागरिकांना नवीन रोपे सहज उपलब्ध व्हावीत या हेतूने प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांच्या आदेशानुसार कैलासनगर गट क्र. 45 येथील जागेत रोपवाटिका सुरू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी देखील लागलीच करण्यात आली होती; परंतु आज या ठिकाणी पाहणी केली असता रोपवाटिकेच्या फलकाशिवाय दुसरे काहीच निदर्शनास पडत नाही. येथील रोपवाटिका आणि तिचा फलक फक्त फोटो सेशन, सेल्फी आणि कागदोपत्री दाखवणे यासाठी आहे का, असा प्रश्न पडतो.
 • कारवाई होणार का?
  अतिक्रमणे काढलेल्या जागेत जर नव्याने अतिक्रमणे झाली आणि याठिकाणी नवीन वृक्षलागवडी झालेल्या जागेतील झाडे ढिसाळ नियोजन आणि पाण्याअभावी जळाली तर येथील प्रभारी अधिकारी, वनकर्मचारी यांच्यावर कारवाई करणार अशी तंबी प्रांताधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय अधिकारी यांनी वनविभागातील अधिकाऱ्यांना दिली होती. या ठिकाणी 100 ते 150 मीटर अंतरावर कुकडी नदीचे पाणी उपलब्ध असताना देखील येथील सगळीच झाडे पाण्याअभावी जळाली असून, वृक्षसंगोपनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार का, याकडे येथील वनप्रेमींचे आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
 • जागतिक तापमानात होणारी वाढ रोखण्यासाठी आणि जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याकामी महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेले वृक्षारोपणाचे धोरण चांगले असून, प्रशासनाचे वृक्षसंगोपानाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याने झाडांच्या मृत होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. याकामी शासन मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असून, हलगर्जीपणा, तसेच नियोजनाच्या अभावामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात जात आहे याची खंत वाटते.
  – नामदेव खैरे, जिल्हा उपाध्यक्ष भाजप
 • शासन ज्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीस वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देत आहे आणि वृक्षसंगोपनाची जबाबदारी टाकून ती झाडे जगवण्याचे आव्हान देत आहे, त्याप्रमाणे प्रशासकीय विभागांना ही जबाबदारी देऊन त्याचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगावे, जेणेकरून ही झाडे जगातील आणि शासनाचे उद्दिष्ठ सफल होईल
  – समीर मांडे, उपसरपंच, ओझर
 • या ठिकाणी जवळच कुकडी नदी आणि येडगाव जलाशयाचे पाणी उपलब्ध असून, येथील झाडे पाण्याअभावी जळली याचे आश्‍चर्य वाटते. यात पूर्णतः वनविभागाचा हलगर्जीपणा आणि नियोजनाचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे
  – दत्तात्रय भोर, ग्रामपंचयत सदस्य, हिवरे बुद्रुक
 • लोकशासन जनांदोलकांची अतिक्रमणे काढताना जेवढी तत्परता दाखवली गेली तेवढी तत्परता येथील झाडे जगवताना का दाखवली गेली नाही? हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे.
  – रमेश पुजारी, लोकशासन जनांदोलक
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)