रांका ज्वेलर्स चोरी प्रकरण : कर्जाचे ओझे उतरविण्यासाठी कर्मचाऱ्याकडून लुटीचा बनाव

 चौघांना अटक:  शेतात पुरलेले दागिने जप्त

पुणे – रांका ज्वेलर्समधील चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात पोलिसांना 48 तासांत यश आले आहे. कर्जाचे ओझो उतरविण्यासाठी कर्मचाऱ्याने वडिल, भाऊ आणि मित्राच्या मदतीने स्वत:ला लुटण्याचा बनाव केल्याचे उघड झाले आहे. खंडणी विरोधी पथकाने तपास करून मुख्य आरोपीसह चौघांना अटक केली. तसेच लुटलेला 1 कोटी 48 लाख 5 हजार रुपयांचे सोने आणि हिरेजडीत दागिने जप्त केले आहेत. चोरलेले दागिने, हिरे त्याने महाड तालुक्‍यातील पाचाड, रायगडवाडीतील शेतामध्ये पुरुन ठेवले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अजय मारूती होगाडे (वय 21, रा. सायन, कोळीवाडा, मुंबई मुळ रा. रायगडवाडी, पाचाड, ता. महाड, जि. रायगड) त्याचे वडिल मारूती बाबु होगाडे (वय 55), भाऊ शरद होगाडे (वय 22) आणि मित्र अन्नु कुमार मद्रासी यांना अटक केली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रांका ज्वेलर्सच्या दुकानात काम करणारा अजय होगाडे हा सोने तसेच हिरेजडीत दागिने ठेवलेली बॅग घेवून मुंबई येथून पुणे रेल्वे स्टेशनवर उतरला. शुक्रवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ताडीवाला रस्त्याच्या बाजुने बाहेर पडल्यानंतर तिघांनी चाकुने वार करीत दीड कोटींचे हिरे तसेच सोन्याचे दागिने ठेवलेली बॅग लुटून नेली. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे खंडणी विरोधी पथक करीत होते.

घटनेचा जबाब नोंदविताना पोलिसांना अजय होगाडेवर संशय आला होता. त्याच्या अंगावरील वार पाहाता हा बनाव असल्याचे लक्षात आले. त्याला विश्‍वासात घेत तपास केला असता खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज डोईजड झाल्याने त्याने वडिल, भाऊ आणि मित्राच्या मदतीने हिरे तसेच दागिने लुटल्याचा बनाव रचल्याचे कबूल केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त समीर शेख, खंडणी विरोधी पथकाचे रघुनाथ जाधव, उपनिरीक्षक राहुल घुगे, कर्मचारी प्रमोद मगर, धीरज भोर, मंगेश पवार, फिरोज बागवान, अविनाश मराठे, रमेश गरूड, उदय काळभोर, सुधीर इंगळे, एकनाथ खंदारे, महेश कदम, मनोज शिंदे, प्रदिप शिंदे, शिवानंद बोले आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)