रस्त्यावर धूळ; व्यवस्थेची “माती’

धुलिकणांनी पुणेकर त्रस्त : उपनगरांत बिकट परिस्थिती

पुणे – शहर स्वच्छतेच्या नावाने कितीही प्रयत्न केले, तरी ते अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. त्यात पावसामुळे होणारा चिखल आणि रस्ते सुकल्यानंतर वाढणारी धूळ या किरकोळ पण अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसत आहे. यामुळे वाहनचालकांच्या नाका-तोंडात धूळ जात असून जीवघेणे आजार जडण्याची भीती आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या काही दिवसांत पुणे शहर आणि परिसरात सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे ठिकठिकाणी तळे साचत आहे. शिवाय कितीही झाडणकाम केले, तरी वाहनांच्या चाकांना चिटकून येणारी माती रस्त्यांवर तशीच राहते. थोडा वेळासाठी पाऊस थांबल्यानंतर रस्ते सुकू लागताच ही माती वाहनांसोबत उडते. विशेषत: दुचाकीस्वारांना या धुळीचा त्रास होत आहे. अनेकदा ती नाक-डोळ्यांत जाते. त्यामुळे वाहन चालविताना शिंक येणे, डोळ्यांची आग होणे असे प्रकार होत आहेत.

एकिकडे पुणे शहर “स्मार्ट’ होत असल्याचा डांगोरा महापालिका पिटत आहे. पण, दुसरीकडे रस्ते स्वच्छतेसारख्या मूलभूत सेवांकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेषत: रस्ते दुभाजकात लावलेल्या झाडांखालील माती रस्त्यावर पडते. ती पाण्यात मिसळून त्याचा चिखल होतो. ऊन पडले, की या मातीची धूळ होत आहे. विशेष म्हणजे, महापालिकेकडे स्वत:ची धूळ स्वच्छता यंत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रस्ते स्वच्छतेचा भार केवळ कामगारांवरच असून होणारे कामदेखील अपूर्ण होत आहे. याचा फटका वाहनचालक आणि पादचाऱ्यांना सहन करावा लागत आहे.

किरकोळ मुद्यांवरून महापालिका सभेत गदारोळ करणारे लोकप्रतिनिधीदेखील या रस्ते स्वच्छतेबाबत तितकेसे सजग नाहीत. कचरा आणि इतर स्वच्छतेबद्दल नेहमीच चर्चा होते. मात्र, रस्ते स्वच्छतेबद्दल सर्वच नेते गप्प आहेत. पावसाळ्याचे काही दिवस वगळता इतर दिवस साधारणपणे 10 महिने या धुलिकणांचा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय यामुळे हवेचे होणारे प्रदूषण हा मुद्दादेखील लक्षात घेणे गरजेचे आहे.

विकासकामांचा राडारोडा तसाच
शहरात सध्या ठिकठिकाणी विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे अर्थातच खोदकामदेखील सुरू आहे. त्यामुळे भूगर्भातील माती उपसून ती जमिनीवर टाकली जाते. वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या झोताने ती उडते. त्यामुळे विकासकामे करताना त्याचा राडोराडा रस्त्यालगत तसाच पडू न देण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.

मोठ्या वाहनांमुळेही धुळीचा त्रास
विशेषत: ट्रक, पीएमपी आणि मध्य वस्तीतून धावणाऱ्या एसटी बसेसमुळे धुलिकणांचे प्रमाण शहरात प्रचंड वाढले आहे. अरुंद रस्ते असल्याने वाहनचालकांना या मोठ्या वाहनांमागूनच जावे लागते. अशावेळी वाहनातून निघणारा धूर आणि धूळ या दोन्हींमुळे पुणेकरांचा कोंडमारा होत आहे.

धुळीमुळे होणारे आजार
धुलिकण हे वाहनचालकांच्या नाका-तोंडात गेल्याने त्यांना विविध आजारांची लागण होण्याची शक्‍यता असते. यात प्रामुख्याने, डोळ्यांवर सूज येणे, खाज येणे, अॅलर्जी होऊन डोळे सतत लाल होणे, श्‍वसनक्रियेला त्रास होतो. धुलिकण शरीरात गेल्याने अर्धवट श्‍वसनक्रिया होऊन रक्तदाब कमी होत असल्याचेदेखील अनेकदा समोर आले आहे. त्याचबरोबर या धुलिकणांमुळे फुफ्पुसाचा आजार होण्याची शक्‍यता असते. या धुलिकणांमुळे कायमस्वरुपी होणारी सर्दी आणि खोकल्याचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी अशा वातावरणात न जाता तोंडाला मास्क बांधून घराबाहेर पडावे, असा सल्ला देण्यात येतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)