रस्त्याच्या दुरुस्तीचे काम पंधरा दिवसांपासून बंद

बोरी खुर्द येथे वाहतुकीला अडथळा ः नागरिक त्रस्त

बेल्हे- बोरी खुर्द (ता. जुन्नर) येथील गावठाणात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम अनेक दिवसांपासून बंद असल्याने, त्या रस्त्यावर ग्रामस्थांना वाहतुकीला अडथळा होत आहे. सध्या या रस्त्याची अवस्था ग्रामस्थांसाठी असून अडचण,नसून खोळंबा, अशी झाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बोरी खुर्द (ता. जुन्नर) गावठाणाजवळ असलेल्या एका रस्त्याच्या दुरुस्ती काम काही दिवसांपूर्वी सुरू होते. ते काम जवळपास पंधरा दिवसांपासून बंद आहे. सबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करताना रस्त्यालगत मोठा चर खणून ठेवला आहे. हा चर बुजवला नसल्यामुळे येथे अनेक अपघात होत आहेत. रस्त्याचे काम गेल्या पंधरा दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. हा रस्ता गावात मुख्य बाजारपेठत जाण्यासाठी असल्याने येथे सतत वाहनांची वर्दळ असते. रस्ता वाहतुकीला बंद असल्याने सध्या ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.