रशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : जयराम, प्रतुल, मिथुन यांची विजयी सलामी 

व्लाडिव्होस्टॉक – व्हाईट नाईट्‌स स्पर्धेतील उपविजेता अजय जयरामसह प्रतुल जोशी, मिथुन मंजुनाथ, सिद्धार्थ प्रताप सिंग आणि राहुल यादव या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर वेगवेगळ्या शैलीत मात करताना येथे सुरू झालेल्या रशिया ओपन टूर सुपर-100 बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीत विजयी सलामी दिली. दुखापतीतून परतलेल्या अजय जयरामने गेल्याच आठवड्यांत व्हाईट नाईट्‌स स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. अजयने पहिल्या फेरीत कॅनडाच्या झियाओडॉंग शेंगचा 21-14, 21-8 असा सहज पराभव करताना दुसऱ्या फेरीत धडक मारली. आता त्याच्यासमोर भारताच्याच शुभंकर डे याचे आव्हान आहे. शुभंकरला पहिल्या फेरीत बाय मिळाला. भारताच्या चिराग सेनलाही पहिल्या फेरीत बाय मिळाला असला, तरी दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर स्पेनच्या अग्रमानांकित पाब्लो ऍबियनचे आव्हान आहे.

प्रतुल जोशीने कॅनडाच्या जेफ्री लॅमचा 21-11, 21-8 असा पराभव करीत विजयी सलामी दिली. दुसऱ्या फेरीत त्याच्यासमोर इस्रायलच्या मिशा झिबरमनचे आव्हान आहे. राहुलने रशियाच्या मॅक्‍सिम माकालोव्हला 21-11, 21-10 असे पराभूत करताना आठव्या मानांकित सौरभ वर्माशी लढतीची निश्‍चिती केली.तर सिद्धार्थने मलेशियाच्या जिया वेई टॅनचे आव्हान 21-17, 21-16 असे मोडून काढताना भारताच्याच बोधित जोशीविरुद्धच्या लढतीची निश्‍चिती केली. तसेच मिथुन मंजुनाथने बेल्जियमच्या इलियास ब्रॅकेवर 21-14, 21-13 अशी मात केली. पहिल्या फेरीत बाय मिलालेल्या गुरुसाईदत्तसमोर दुसऱ्या फेरीत रशियाच्या व्लादिमीर माल्कोव्हचे आव्हान आहे. तर पारुपल्ली कश्‍यपला दुसऱ्या फेरीत जपानच्या रयोतारो मारुओशी झुंज द्यावी लागेल. वैदेही चौधरी, साई उत्तेजिता राव, वृषाली गुम्माडी, मुग्धा आग्रे व ऋतुपर्णा दास या महिला खेळाडूंच्या उद्या सलामीच्या लढती होतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)