रत्नागिरी हापूसचा गोडवा पाडव्यानंतर वाढणार

येत्या आठवड्यात आवक वाढण्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज

पुणे – सर्वांचे आवडते फळ म्हणजे आंबा. रत्नागिरी हापूसची कोकणातून तुरळक आवक होत असून, नेहमीच्या तुलनेत केवळ 25 टक्केच आवक होत आहे. गुढी पाडव्यानंतर आंब्याचा गोडवा वाढणार आहे. तोपर्यंत आंब्याचे भाव चढेच राहणार आहेत. पाडव्यानंतर आंब्याची आवक वाढेल, आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात येईल.

गुढी पाडव्याला पूजेसह खाण्यासाठी मार्केटयार्डात आंब्याला मोठी मागणी असते. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पावस, खंडाळा येथून हापूसच्या 400 ते 500 पेट्या बाजारात दाखल होत आहे. तर, रविवारी ही आवक 1,500 पेट्यांच्या आसपास असल्याचे सांगून आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, “बाजारात दाखल होण्याऱ्या हापूस आंब्याला सध्या घाऊक बाजारात दर्जानुसार 4 ते 8 डझनाच्या पेटीला 2 हजार ते 4 हजार रुपये भाव मिळत आहे. तर होलसेल बाजारात डझनाला 1 ते 2 हजार आणि किरकोळ बाजारात 1 हजार 500 ते 3 हजार रुपये भाव मिळत आहे. सध्या हापूसच्या चांगल्या प्रत आणि आकाराची प्रतीक्षा आहे. आंब्याच्या चढ्या भावांमुळे सर्वसामान्यांची हंगामाच्या सुरवातीच्या काळात आंबा खाण्याची मानसिकताही नसते.’

गुढीपाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर येत्या आठवडाभरात कोकणातून हापूसच्या आवकेत दुपटीने वाढ होईल, अशी शक्‍यता व्यक्त करत मोरे म्हणाले, “जरी आंब्याची आवक वाढली, तरीही मागणीच्या तुलनेत कमीच असणार आहे. यंदा थ्रीप्स आणि तुडतुड्याच्या प्रभावासह वातावरणातील बदलांचा फटका आंब्याला बसल्यामुळे आवक कमी प्रमाणात होत आहे. बाजारात दाखल होणारा आंबा हा सध्या कच्चा, कोवळा असून भाव सध्यातरी महागच आहेत. गुढी पाडव्यानंतर कोकणातील हापूस आंब्याची नियमित आवक अपेक्षित आहे. चालूवर्षी अनुकूल हवामानामुळे आंब्यांना मोहोर धारणा चांगली झालेली आहे. त्यामुळे ग्राहकांना पंधरा ते वीस दिवसानंतर मुबलक आंबा उपलब्ध होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.