रणसिंगवाडीत पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई

पाण्यासाठी दाहीदिशा वनवन भटकंती

खटाव, दि. 7 (प्रतिनिधी) – रणसिंगवाडी (ता. खटाव) येथे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. गावास पाणी पुरवठा करणारी विहीर कोरडी पडल्यामुळे पाण्यासाठी गावातील अबालवृद्धांना रोज पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
रणसिंगवाडी ग्रामपंचायतीची विहीर कोरडी पडल्याने नळ पाणीपुरवठा बंद पडला आहे. ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. रणसिंग वस्तीवरील एका हातपंपास थोडे पाणी उपलब्ध आहे. तेथेच पाणी भरण्यास ग्रामस्थांची झुंबड उडत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून याही हातपंपाची पाणी पातळी खालावल्यामुळे आता पाण्याच्या शोधात रानोमाळ भटकण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गाव शिवारात तीस ते पस्तीस विहीरी आहेत. त्यातील चार ते पाच विहिरींना थोडेफार पाणी आहे. उन्हाच्या तीव्रतेने व ढगाळ वातावरणामुळे या विहीरींचीही पातळी झपाट्याने कमी होत चालली आहे. सर्व विहिरी जेसीबीच्या सहाय्याने खोदल्यामुळे विहीरीला पायऱ्याच नाहीत. परिणामी विहीरीतील पाणी महिलां-मुलांना कठड्यावर उभे राहून दोरीच्या सहाय्याने शेंदावे लागत आहे. गावात सुमारे साडेतीनशे कुटूंबे असून लोकसंख्या 1460 दरम्यान आहे. 1974 मध्ये गावानजीक पुर्वेला रोजगार हमीतून पाझर तलाव बांधला आहे. यालगतच गावाला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. विहीर तलावाजवळ असूनही वर्षातील चार महिने कोरडी पडते. सध्या नळ पाणी पुरवठा योजना लोकसंख्येच्या तूलनेत अपूरी पडत आहे. गावाच्या शेजारीच दोन पाझर तलाव आहेत. तेही तलाव कोरडे पडल्यामुळे सध्या जनावरांच्या व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. ग्रामस्थ सध्या जिहे कठापूर योजनेच्या आंधळी बोगद्यातील पाणी डोक्‍यावरून वाहून आणून जनावरांची तहान भागवत आहेत.
ग्रामस्थांची मात्र पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती सुरूच आहे. गाव टॅंकरमुक्त व पाणीदार बनवण्यासाठी ग्रामस्थांनी तीन वर्षात जलसंधारणाची कोठ्यावधीची कामे गाव शिवारात केली आहेत. दरवर्षी उन्हाळ्यातील चार महिने ग्रामस्थ श्रमदान व लोकसहभागातून पाणी अडवण्यासाठी झटत आहेत. परंतु, गेल्या दोन वर्षात पावसाचे प्रमाण अल्प राहिल्याने गावावर पाण्याचे संकट कोसळले आहे. गावाच्या पाण्याची निकड शासनस्तरावरून भागवली जावी, अशी अपेक्षा सूज्ञ ग्रामस्थांमधून होत आहे.

 

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.