रजनीश गुरबानीला अखेर संधी!

प्रथम दर्जाच्या सामन्यात विदर्भकडून खेळणारा गुरबानी खरे तर यापूर्वीच ‘अ’ संघात निवडला जायला हवा होता. पण ‘देर आए दुरुस्त आए’ असेच निवड समितीबाबत म्हणावे लागेल. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत 2015 पासून गुरबानी आणि मयांक अगरवाल आपली छाप पाडत आहेत. त्यांना संधी काही मिळत नव्हती, यावेळी मात्र दोघांनाही संधी मिळाली. मयांकने या रणजी मोसमात धावांचा, तर गुरबानीने बळींचा पाऊस पाडला आहे. मयांकला स्पर्धा खूप आहे. त्यामुळे मधल्या फळीत त्याने काही अद्वितीय आणि सातत्यपूर्ण कामगिरी केली तरच त्याला भारताच्या मुख्य संघात स्थान मिळेल अन्यथा त्याला आणखी वाट बघावी लागेल.

गुरबानीची गोष्ट थोडी वेगळी आहे. त्यालाही स्पर्धा आहे, पण भारताचा प्रमुख संघ जेव्हा सातत्याने खेळत असतो तेव्हा प्रमुख फलंदाज फारसे विश्रांती घेताना दिसत नाहीत. उलट गोलंदाजांना विश्रांती दिली जाते. अशा वेळी गुरबानीला निश्‍चितच संधी मिळू शकते. मात्र त्यासाठी त्याने ‘अ’ संघाकडून या चार दिवसीय सामन्यांच्या मालिकेत प्रभावी कामगिरी करायला हवी. ‘अ’ संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड गुरबानीकडे विशेष लक्ष देणार हे उघड आहे, कारण रणजीतील गुरबानीच्या कामगिरीवर द्रविडने देखील स्तुतीसुमने उधळली होती. रणजी करंडक स्पर्धा यंदा विदर्भाने जिंकली, हे त्यांचे पहिलेच विजेतेपद ठरले. या सामन्यात गुरबानीने हॅट्ट्रिक घेतली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात अंतिम सामन्यातील ही केवळ दुसरीच हॅट्ट्रिक ठरली. 1972-73च्या रणजी स्पर्धेचा अंतिम सामन्यात तमिळनाडूच्या वी. कल्याणसुुंदरम याने मुंबई विरुद्ध हॅट्ट्रिक मिळवली होती, त्यानंतर जवळपास 45 वर्षांनी गुरबानीने ही किमया केली. ही त्याची रणजीच नव्हे, तर एकूणच प्रथम दर्जाच्या सामन्यातील पहिलीच हॅट्ट्रिक ठरली. दिल्ली विरूध्दच्या अंतिम सामन्यात डावातील 23 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर विकास मिश्राचा तर सहाव्या चेंडूवर नवदीप सैनी याचा त्याने त्रिफळा उडवला व 25व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने ध्रुव शौरी याला यष्टीचित बाद करत हॅट्ट्रिक पूर्ण केली. या सामन्यात त्याने एकूण सहा बळी मिळवले. ते देखील घोट्याला दुखापत झालेली असताना. त्याची हीच जिगरबाज वृत्ती राहुल द्रविडला सुखावून गेली.

केवळ अंतिम सामन्यातच नव्हे, तर गुरबानीने त्या आधीच्या उपांत्य सामन्यात बलाढय कर्नाटकविरुद्ध पहिल्या डावात पाच तर दुसऱ्या डावात सात असे एकूण बारा गडी बाद केले होते व संघाला स्वप्नवत अंतिम फेरी गाठून दिली होती. त्याचवेळी त्याची युवा संघात निवड व्हावी असे वाटत होते. मात्र निवड समिती प्रमुख नावांखेरीज अन्य नावांचा विचारच करण्याच्या मनस्थितीत नव्हती. आपल्याकडे लोढा समिती येवो, प्रशासक येवो किंवा कोणताही खेळाडू असामान्य कामगिरी करो. निवड समिती ‘कोटा’ पद्धती काही सोडणार नाही. हा भारतीय क्रिकेटला जडलेला ‘कॅन्सर’ सारखा रोग आहे. वेळीच उपचार करायला हवेत, अन्यथा कित्येक सरस खेळाडूंचा या पद्धतीमुळे बळी जाईल. इंग्रजांनी सुरू केलेल्या काही गोष्टी आजही आपण बदलू शकलेलो नाही.

कोटा पध्दत ही तशीच एक गोष्ट आहे. सर्व पाचही विभागचे सदस्य पूर्वी निवड समितीत असायचे आता तीन सदस्य असतात. मात्र कोणाचाच नवीन खेळाडूंवर विश्‍वास नसतो, यात मात्र कमालीचे सातत्य असते. इशांत शर्माला पुन्हा एकदा इंग्लंडला घेऊन जातो आहोत. तो काय दिवे लावणार ते कळेलच. मात्र गुरबानीसारख्या युवा खेळाडूंना अशा वेळी संधी दिली तरच त्यांना प्रोत्साहन मिळेल. अर्थात त्याने आता हा विचार न करता आपल्या संधीचे सोने करावे.

सर्व खेळात प्राविण्य
गुरबानीची जेव्हा विदर्भ संघात निवड झाली होती तेव्हा एक निवड समिती सदस्य कुत्सितपणे म्हणाले होते, ‘हा पोरगा काय वेगवान गोलंदाजी करणार?’ गुरबानीने तेव्हा तोंडून चकार शब्दही काढला नाही. मात्र आपल्या कामगिरीने त्याने या निवड समिती सदस्याचे दात त्याच्याच घशात घातले. एकाच मोसमात 39 बळी घेत त्याने विदर्भ संघाला रणजी स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. एकाच मोसमात सर्वाधिक बळी घेणाऱ्या रणजी गोलंदाजांच्या यादीत गुरबानी आता दुसऱ्या स्थानावर आहे.

गुरबानी केवळ एक क्रिकेटपटू म्हणूनच ओळखला जातो असे नाही, तर तो पेशाने सिव्हिल इंजिनिअर आहे. त्याचबरोबर सुवर्णपदक विजेता धावपटूही आहे. इतकेच नव्हे, तर त्याने बॅडमिंटन आणि बास्केटबॉल स्पर्धेतही सुरुवातीच्या काळात अनेक पुरस्कार पटकावले आहेत. केवळ क्रिकेटची सर्वात जास्त आवड म्हणून त्याने इतर खेळांकडे पाठ फिरवली आणि आता क्रिकेटमध्येच कारकीर्द घडवायची असा पण केला. त्याचा ‘अ’ संघातील समावेश हे कारकिर्दीतील मोठे यश आहे. आता तो केवळ चोवीस वर्षांचा आहे, खूप मोठी कारकीर्द समोर आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘अ’ संघाकडून त्याला पहिलाच दौरा इंग्लंडचा मिळाला आहे त्यामुळे तेथील वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्ट्यांवर आणि ढगाळ हवामानाच्या जोरावर तो नक्कीच यशस्वी होईल असा विश्‍वास वाटतो.

संपूर्ण मालिकेबाबत गांभीर्याने राहण्याऐवजी प्रत्येक सामन्याकडे गांभीर्याने पाहण्याची त्याची सवय आणि स्वभाव आज कौतुकाचा विजय ठरत आहे. हेच एखाद्या खेळाडूचे मोठेपणाचे लक्षण असते. यंदाचा मोसमात नवीन प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, वरिष्ठ खेळाडू वसिम जाफर, गोलंदाजीचे प्रशिक्षक सुब्रतो बॅनर्जी आणि कर्णधार फैज फजल यांनी पहिल्या सामन्यापासून गुरबानीवर विश्‍वास टाकला आणि त्यानेही हा विश्‍वास सार्थ ठरवताना विदर्भ संघाला स्वप्नवत रणजी विजेतेपद मिळवून दिले.

पठाणपेक्षा धोकादायक इनस्विंगर
गुरबानीच्या भात्यात एका वेगवान गोलंदाजाकडे असावीत अशी सगळी अस्त्रे आहेत. यॉर्कर, आऊट स्विंगर, स्लोअर वन, नक्कल बॉल, बाऊन्सर, लेग्न्‌थ बॉल. पण त्याचबरोबर त्याच्याकडे पूर्वीच्या इरफान पठाणसारखा प्रलयकारी इनस्विंगर आहे. आणि हेच त्याचे ब्रम्हास्त्र आहे. एकाच ग्रिपवर तो आऊटस्विंग आणि इनस्विंग टाकतो हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्‌य आहे. भारतातील खेळपट्ट्यांवर त्याचे इनस्विंगर इतके प्रभावी ठरले. तर तो परदेशातील पोषक खेळपट्टीवर बडया बडया फलंदाजांना आट्यापाट्या खेळायला लावेल यात शंका नाही.
‘अ’ संघात त्याची आता निवड झाली आहे, त्याने आपल्या सर्व ताकदीनिशी या मालिकेत गोलंदाजी करावी आणि मिळालेल्या संधीचे सोने करावे. तो जर या मालिकेत यशस्वी ठरला तर त्याला भारताच्या प्रमुख संघात स्थान मिळेल. मग काय त्याच्यासाठी सर्वात मोठे व्यासपीठ खुले झालेले असेल.

विश्‍वकरंडक स्पर्धा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेवलेली आहे. त्यासाठी गुरबानी हा एक चांगला ‘सेकंड बेंच’ ठरू शकतो. विदर्भ संघाला रणजी विजेतेपद मिळवून देण्याचे त्याचे स्वप्न त्याने पूर्ण करून दाखवले; आता ‘अ’ संघातील कामगिरीच्या जोरावर भारताच्या प्रमुख संघातही समावेश होण्याचे त्याचे स्वप्नही तो निश्‍चितच पूर्ण करील असा विश्‍वास वाटतो.

अमित डोंगरे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)