रखवालदार झोपला तर झेडपीच्या सगळ्या जागा जातील

दिपक पवारांचा इशारा: वडुज रेस्ट हाऊसवरून विधातेंचे खडेबोल
स्लग – जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा
सातारा- जिल्हा परिषदेच्या साताऱ्यातील जागेतून खासगी बिल्डरला रस्ता तर नुकतेच विसर्जन तळ्याला दिलेल्या जागेच्या मुद्दयावरून दिपक पवार यांनी, रखवालदार असाच झोपला तर झेडपीच्या सगळ्या जागा जातील असा गर्भित इशारा दिला.तर प्रदिप विधाते यांनी वडुज येथील झेडपीच्या मालकीच्या रेस्ट हाऊसची दूरवस्था झाली असून त्या ठिकाणी अवैध प्रकार सुरू आहेत आणि असले प्रकार आपल्यासाठी शोभनीय नाही असा टोला लगावला.

जिल्हापरिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन शुक्रवारी छ.शिवाजी महाराज सभागृहात संजीवराजे ना.निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी दिपक पवार यांच्यासह सदस्यांनी जिल्हापरिषदेच्या स्थावर मालमत्तांचे संरक्षण करण्याची मागणी केली. यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, उपाध्यक्ष वसंतराव मानुकमरे, अति.मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण व अर्थ सभापती राजेश पवार, महिला व बालकल्याण सभापती वनिता गोरे यांच्यासह विविध खातेप्रमुख उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सभेच्या अजेंड्यांवरील सर्व विषयांना मंजुरी दिल्यानंतर दिपक पवार यांनी साताऱ्यातील गणेश विसर्जनासाठी झेडपीची जागा विसर्जन तळ्यासाठी न देण्याचा ठराव यापुर्वीच करण्यात आला होता असे असताना अचानक ती जागा विसर्जन तळ्यासाठी कोणाच्या सांगण्यावरून दिली. तसेच साताऱ्यातील विसर्जन हे त्यांच्या तळ्यामध्ये करण्याचे अगोदरच खासदार साहेबांनी सांगितले असताना झेडपीची जागा का दिली अशी विचारणा केली. तसेच यापुर्वी फार्म हाऊस समोरील 4 कोटी रूपयांची जागा खासगी बिल्डरला रस्त्यासाठी देण्यात आल्याचे निदर्शनास पवारांनी निदर्शनास आणून दिले. त्यावर खुलासा करताना अध्यक्ष संजीवराजे म्हणाले, ती जागा गर्व्हनर ऑफ महाराष्ट्र यांच्या नावावर असून ती केवळ जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. सध्या त्या जागेच्या संरक्षित भिंतीचे काम सुरू असून ते पुर्ण होताच यापुढे कोणत्या ही परिस्थितीत पालिकेला देण्यात येणार नाही असे त्यांनी सांगताच पवार म्हणाले, झेडपीने जागृत राहणे आवश्‍यक असून गाफील राहिलो तर पालिका इतर हक्काने ती जागा ताब्यात घेवू शकेल अशी शंका व्यक्त करून लवकरात लवकर संरक्षित भिंतीचे काम पुर्ण करण्याची मागणी केली.

पवारांपाठोपाठ प्रदिप विधाते यांनी वडुज येथील जिल्हा परिषदेच्या मालकीचे रेस्ट हाऊसची अवस्था दयनीय झाली असून दारे व खिडक्‍या तुटल्या आहेत. त्यामुळे त्या ठीकाणी अवैध प्रकार सुरू असून ते आपल्यासाठी शोभनीय नाही असे सांगितले. त्यावर संजीवराजेंनी बांधकाम अभियंत्यांना तात्काळ रेस्ट हाऊसची दुरूस्ती करण्याचे आदेश दिले. तर मानसिंगराव जगदाळे यांनी जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक जागा जिल्ह्यात आहेत. महाबळेश्‍वर व पाचगणीच्या जागांप्रमाणे सर्व जागांची माहिती घेवून त्या ताब्यात घेण्यात याव्यात अशी मागणी केली. त्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी सर्व जागांची माहिती संकलित करण्यासाठी निवृत्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

साताऱ्यातील ऐतेहासिक वास्तू असलेल्या प्रतापसिंह शाळा व जिल्हा परिषदेच्या इमारतीसाठी सल्लागार म्हणून खासगी वास्तू विशारदारची नेमणूक करण्यात येणार असल्याचे यावेळी संजीवराजे यांनी सांगितले. त्यावर प्रा.डॉ.शिवाजी चव्हाण यांनी प्रतापसिंह हायस्कूल येथे मुख्याध्यापक रिक्त असून त्यामुळे पटसंख्या कमी झाल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर निवृत्त मुख्याध्यापक नियुक्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे संजीवराजे यांनी सांगितले.

धुमाळ, अनपट अन गोरेंची बॅटींग
पिंपोडे गटाचे सदस्य मंगेश धुमाळ यांनी दुर्लक्षित विषयांना आवाज फोडला. ते म्हणाले, अपंग लाभार्थ्यांच्या मोबदल्याची माहिती तालुका स्तरावरून घेतली असताना देखील त्यांचे अनुदान बॅंकेत जमा करण्यापासून रोखण्यात आले आहे. त्याचबरोबर शाळांमध्ये तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वच्छता गृहे बांधण्यात यावीत तसेच महिला व बालकल्याण विभागासाठी निधीची तरतूद करताना विधवा, परितक्ता व देवदासीा महिलांना घरबांधणीसाठी निधीची तरतूद करण्यात यावी. तर सासवड गटाचे धैर्यशील अनपट यांनी रोस्टरचे काम पुर्ण होत नसल्याने शिक्षकांच्या पदोन्नती रखडल्या असून ते काम तात्काळ पुर्ण करण्यात यावे तसेच पशुधनाची जणगणना करून सासवड येथे पशुवैद्यकीय रूग्णालय सुरू करण्यात यावे अशी मागणी केली. तर बिदाल गटाचे सदस्य अरूण गोरे यांनी जिल्हा परिषदेची प्रिटींग प्रेसची खरेदी नेमकी केव्हा होणार अशी विचारणा केली तसेच समाजकल्याण विभागातील लाभार्थींचे प्रस्ताव जाणीवपुर्वक दहिवडी पंचायत समितीमधील शेख नामक अधिकारी झेडपीकडे पाठवत नसून त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी गोरे यांनी केली.

 महामार्गाच्या समस्येवर लवकरच बैठक
पुणे-बॅंगलोर महामार्गावरील शिरवळ हद्दीत सेवा रस्ते उपलब्ध नसल्याचा मुद्दा उदय कबुले यांनी उपस्थित केला. सेवा रस्ते नसल्यामुळे दुचाकी वाहने महामार्गावरून जात असताना त्यांचा अपघात होत आहे. तसेच पुणे येथील स्वारगेट व शिवाजीनगर बसस्थानकावरून कोल्हापुरच्या दिशेने जाणाऱ्या बसेस ह्या शिरवळ बसस्थानकात थांबत नाहीत त्यामुळे प्रवासींचे हाल तर होतात त्याचबरोबर जीव धोक्‍यात घालून प्रवासी हे नाईलाजास्तव महामार्गावर थांबत असल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच अर्चना देशमुख यांनी देखील सातारा लगत खिंडवाडी नजिक दरडी कोसळत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर संजीवराजे व कैलास शिंदे यांनी लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन दिले.

महापुरूषांची नावे देण्याची मागणी
पुणे-बॅंगलोर महामार्गावरील खेड जिल्हा परिषदगटाअंतर्गत असलेल्या उड्डानपुलांना महापुरूषांची नावे देण्याची मागणी सौ.मधू कांतीलाल कांबळे यांनी केली. वाढे फाटा येथील उड्डाण पुलाला महात्मा ज्योतिराव फुले, बॉम्बे रेस्टॉरंट चौक पुलाला छ.शिवाजी महाराज व अजंठा चौक पुलाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. त्यावर संजीवराजे यांनी त्याबाबतचे पत्र लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाला पाठविण्याचे आश्‍वासन दिले.

अध्यक्ष म्हणाले, जॅमर बसवावा लागेल
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये कामकाजाशिवाय फारसे न बोलणारे अध्यक्ष संजीवराजे यांनी शुक्रवारच्या सभेत टोलेबाजी केली. सभेदरम्यान अनेक सदस्य आपआपसात तर काही मोबाईलवर बोलत होते. त्यावर संजीवराजे यांनी आपआपसात बोलू नका असे सांगताना सभागृहात आता मोबाईल जॅमर बसवावा लागेल असा टोला लगावला. तर वाढे फाटा ते लोणंद रस्त्याची दुर्वस्था झाल्याचा मुद्दा सातारा पंचायत समिती सदस्य मिलींद कदम यांनी उपस्थित केला. त्यावर संजीवराजे यांनी तो रस्ता सार्वजनिक बांधकामच्या ताब्यात येत असून मी रोज त्या रस्त्याचा अनुभव घेतोय असे सांगून हतबलता व्यक्त केली. तर मंगेश धुमाळ यांनी सभेसाठी विशेष जॅकेट परिधान केले होते तसेच सभेदरम्यान जोरदार मुद्दे धुमाळ यांनी उपस्थित केले. त्यावर संजीवराजे यांनी कोटी करत, आज धुमाळांनी जॅकेट का घातले हे आता त्यांनी केलेल्या भाषणावरून कळाले असल्याचे सांगितले.

त्या विद्यार्थ्यांसाठी वाहतूकीची व्यवस्था
जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला. त्यावर ज्या शाळांमध्ये खूपच कमी पटसंख्या आहे त्या शाळेतील विद्यार्थी हे शेजारील शाळेमध्ये दाखल करावे लागणार आहेत. दाखल करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाहतूकीची व्यवस्था शासन करणार असल्याचा विचार सध्या सुरू आहे तसेच विद्यार्थ्यांला शेजारील शाळेत पाठविण्यासाई पालकांची संमती घ्यावी लागणार असल्याचे यावेळी कैलास शिंदे यांनी सांगितले.

झेडपीसह मान्यवरांचे अभिनंदनाचे ठराव
स्वच्छ सर्व्हेक्षणमध्ये देशात सातारा जिल्हा परिषदेचा प्रथम क्रमांक करण्यात आल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. पुरस्कार मिळण्यामागे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यांचे योगदान असल्याचे संजीवराजे यांनी आर्वजुन नमूद केले. तर उपाध्यक्ष वसंतराव मानुकमरे यांनी लवकरच आनंद सोहळा आयोजन करण्याचे सुतोवाच केले. तसेच यावेळी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे उपाध्यक्षपदी नितीन बानुगडे पाटील आणि महाराष्ट्र राज्य खो-खो परिषदेच्या अध्यक्षपदी संजीवराजे यांनी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचे ठराव करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)