रखवालदारावर “सक्‍तीच्या सेवानिवृत्ती’ची कारवाई

पिंपरी –पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतील कर्मचाऱ्यांचे विना परवानगी गैरहजर राहण्याचे प्रमाण वाढले आहे. याच कारणास्तव एका रखावालदारावर सक्‍तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे. तर दुसऱ्या प्रकरणात माध्यमिक शिक्षण विभागातील एका शिपायाच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

दत्तात्रय बुचडे हे महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागांतर्गत रखवलादार या पदावर कार्यरत होते. 11 फेब्रुवारी 2012 ते 2 फेब्रुवारी 2018 या कालावधीत ते एकूण 1840 दिवस विना परवानगी गैरहजर राहिले. महापालिकेत त्यांची प्रदीर्घ सेवा झाली आहे. याशिवाय महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागात शिपाई पदावर कार्यरत असलेले खंडू साखरे 31 नोव्हेंबर 2016 ते 16 जानेवारी 2019 या कालावधीत एकूण 677 दिवस विना परवानगी गैरहजर होते.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढले आहे. काही ठराविक कर्मचारी विभागप्रमुखांना कोणतीही पूर्वकल्पना न देता वारंवार गैरहजर राहतात. त्यामुळे कामकाजात अडथळा निर्माण होत असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांना सुधारण्याची वारंवार संधी देऊनही, त्यांच्या वर्तणुकीत कोणताही बदल झाला नसल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

या दोन्ही कर्मचाऱ्यांना प्रशासनाने त्यांच्या या गैरवर्तनाबद्दल वारंवार नोटीस बजावली आहे. तसेच या दोन्ही कर्मचाऱ्यांनी या नोटीशींचा खुलासा केलेला नाही. त्यामुळे या दोन्ही कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या कर्तव्यात सचोटी न राखता व कर्तव्यपरायणता न ठेवल्यामुळे गैरहजर राहिल्याने महापालिका कामकाजात अडथळा निर्माण झाल्याचे दोषारोप सिद्ध झाले. त्यामुळे दत्तात्रय बुचडे यांच्यावर सक्‍तीने सेवानिवृत्तीची कारवाई करण्यात आली आहे. शिपाई खंडू साखरे यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.